सांगली : खून केल्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या आरोपीने जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून यशस्वी पलायन केले असून यामुळे पोलीस यंत्रणेत जोरदार खळबळ उडाली आहे.
मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना अनेकदा पोलीस मोठ्या परिश्रमाने आणि कौशल्य वापरून गजाआड करतात पण अटक केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे हे आरोपी अटकेतून देखील पळून जातात. अधून मधून अशा घटना घडतात. उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर किंवा शौचालयात नेल्यानंतर आरोपी पळून जातात. कधी कधी तुरुंगाची कौले काढून किंवा खिडकीचे गज कापून देखील आरोपी पळून जातात, सांगलीत मात्र जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून (Sangli Crime) खुनासारखा गंभीर गुन्हा केल्याचा आरोप असलेला संयाषित आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाल्याने खळबळ उडणे स्वाभाविक आहे. सुनील राठोड असे या पलायन केलेल्या आरोपीचे नाव असून यामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील एका खून प्रकरणी पोलिसांनी विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील येळगोड येथील सुनील ज्ञानेश्वर राठोड आणि त्याच्या पत्नीला अटक केली होती. त्यानंतर त्याला कारागृहात ठेवण्यात आले होते. या कारागृहातून तो आज पळून गेला असून याबाबत पोलिसांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुनील राठोड हा मंगसुळी येथील जेसीबी मालक असलेले हरी येडूपल पाटील यांचाकडे चालक म्हणून काम करीत होता. हरी पाटील या जेसीबी मालकाने सुनीलच्या पत्नीशी गैरवर्तन केले त्यामुळे चिडलेल्या सुनील राठोड आणि त्याची पत्नी पार्वती यांनी पाटील याचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. दोन दिवस प्रेत घरात ठेवून नंतर हा मृतदेह प्लास्टिक कागदात गुंडाळून विहिरीत टाकला होता. ८ जून २०२१ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी सुनील आणि त्याच्या पत्नीला अटक केली होती.
पाटील याचा खून केल्यानंतर राठोड पती आणि पत्नी पुण्याकडे पळून गेले होते, विशेष म्हणजे पळून जाताना त्यांनी पाटील यांचा जेसीबी देखील पळवून नेला होता. पोलिसांनी त्यांना जेसीबीसह पुण्यातून अटक करण्यात यश मिळवले होते. त्याला अटक केल्यानंतर पोलीस कोठडी देण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. आज मात्र तो कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून आणि पोलिसांच्या हातावर तुरी देवून तो पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर पोलीस यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आणि तातडीने पलायन केलेल्या आरोपीचा शोध सुरु केला पण सदर आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. (accused of murder escapes from prison) पोलिसांचे एक पथक कर्नाटककडे शोधासाठी गेले असून अन्यत्र देखील या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !