BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ ऑग, २०२२

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अडचणीत !


 

शोध न्यूज : राष्ट्रवादीच्या मागे अलीकडे काही ना काही लागत असताना आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील अडचणीत आले असून विनापरवाना बस चालविल्यामुळे भाजपने त्यांच्यावर पोलिसात तक्रार केली आहे. 


कुठलेही वाहन चालवताना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची परवानगी लागते. विना लायसेन्स साधी दुचाकी चालवली तरी पोलीस दंड वसूल करतात किंवा खटला भरतात. दुचाकीचे लायसन्स असले तरी त्याला चार चाकी चालवता येत नाही आणि चार चाकी वाहनासाठी परवाना काढलेला असला तरी जड वाहन चालवता येत नाही. त्यात प्रवाशी वाहन चालाविण्यासाठीचे नियम आणखी वेगळे आहेत. रिक्षापासून बस चालविण्यासाठी वेगळे नियम आणि अटींची पूर्तता करावी लागते तेंव्हा प्रादेशिक अधिकारी वाहन चालविण्याचा परवाना देतात. त्याशिवाय ही वाहने चालवता येत नाहीत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट राज्य परिवहन महामंडळाची बस बस चालवली.  


स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी इस्लामपूर आगाराची राज्य परिवहन महामंडळाची 'विठाई' बस (एम एच १३/ सीयु ८१२२) सजविण्यात आली होती. याचवेळी आमदार जयंत पाटील हे तहसील चौकात आले होते. सजवलेली बस पाहून त्यांना ही बस चालविण्याचा मोह झाला. त्यांनी तशी इच्छा व्यक्त केल्यावर एवढ्या मोठ्या नेत्याला नकार तरी कोण देणार ? जयंत पाटील यांनी ही बस शहरातील रस्त्यावरून चालवली आणि याचे मोठे कौतुकही झाले. पाटील बस चालवीत असल्याची छायाचित्रे व्हायरल देखील झाली आणि पाटील यांच्या बस चालविण्याची चर्चाही रंगू लागली. भाजपने मात्र हा मुद्दा उचलून धरीत जयंत पाटील यांच्याविरुद्ध पोलिसात धावा घेतली आणि तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 


भाजपचे वाळवा तालुका अध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुका भाजप ओबीसी सेल अध्यक्ष मधुकर हुबाले, तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाची तक्रार केली आहे. (NCP state president Jayant Patil is in trouble) राज्य परिवहन महामंडळाकडे बस चालक म्हणून नियुक्ती नसताना त्यांनी ही बस चालवली आहे. परिवहन महामंडळाकडे चालक म्हणून  नियुक्ती होण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा बॅच, बिल्ला नसताना, जड वाहन चालक म्हणून परवाना नसताना आणि एस टी चालविण्याचा कसलाही अनुभव नसताना पाटील यांनी शहरातील रस्त्यावरून बस चालवली आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे  


जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहरातून बस चालवली त्यावेळी स्वातंत्र्य दिनामुळे रस्त्यावर गर्दी होती, त्यामुळे रस्त्यावरील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपने  केली. पोलिसांनी मात्र लगेच गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दाखवली, आत्ताच गुन्हा दाखल करावा असा आग्रह भाजप कार्यकर्त्यांचा होता पण पोलिसांनी त्याला तयारी दाखवली नाही.


कायदेशीर बाबी तपासून घेऊन पुढील प्रक्रिया करतो, थोडा वेळ द्या असे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.  संध्याकाळपर्यंत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे आता जयंत पाटील यांच्यावर कारवाई होणार का? झालीच तर नेमकी काय कारवाई होईल ?  याकडे सांगली जिल्ह्याचे आणि महाराष्ट्रातील राजकारणाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !