BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ ऑग, २०२२

'--पण माझ्या लेकराला मारायचं नव्हतं' ! विनायक मेटेंच्या आईचा आकांत !



शोध न्यूज : "मंत्रीपद द्यायचं नव्हतं पण माझ्या लेकराला मारायचं नव्हतं" असा आकांत स्व. आमदार विनायक मेटे यांच्या आईने केला असून हा रोख कुणाकडे आहे हाच प्रश्न उपस्थित झाला आहे.


शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र हळहळला आहे. मेटे यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत पण त्यांच्या अपघाताबाबतची संशयाची आग अधिकच भडकत चालली आहे. विनायक मेटे यांचा पुणे- मुंबई प्रवासाच्या दरम्यान झालेला अपघात हा संशयाच्या धुक्यात असून या धुक्यातून देखील काही चित्र अस्पष्ट दिसत आहे. अपघात झाल्यानंतर मेटे यांच्या कार्यकर्त्यांनी पहिली शंका व्यक्त केली आणि हा अपघात नसून घातपात आहे. या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही ठामपणे संशय व्यक्त करीत चौकशीचा मुद्दा उचलून धरला. हे घडत असतानाच मेटे यांच्या डॉक्टर असलेल्या पत्नींनी तर अवघा घटनाक्रमच सांगितला आणि सगळ्या संशयाच्या वातावरणाला बळकटीच दिली. 


संशयाचे प्रचंड धुके दाटले असताना शिव संग्राम पक्षाचे कार्यकर्ते मायकर यांनी तर मोठा गौप्यस्फोट करून अपघाताची ही घटना हा केवळ घातपात असल्याचे स्पष्ट केले. ३ ऑगस्ट रोजीच अपघात घडविण्याचा प्रयत्न केला गेला होता याची माहितीच त्यांनी दिली त्यामुळे तर वातावरण ढवळून निघाले आहे. यासंदर्भातील एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आणि कथित अपघातामागे नक्की काही कारस्थान असल्याचे आता सगळ्यांनाच वाटू लागले आहे. पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर येणारच आहे पण स्व. विनायक मेटे यांच्या आईंची काही वाक्य अत्यंत बोलकी असून त्याचा रोख मात्र कुणाकडे आहे हे समजू शकले नाही. तथापि हा अपघात नसून घातपात आहे हे मात्र त्यांच्या आईने स्पष्ट सूचित केले आहे. 


"आमदारकी द्यायची नव्हती, मंत्रीपद द्यायचं नव्हतं, पण माझं लेकरू मारायचं नव्हतं " अशी प्रतिक्रिया मेटे यांच्या आईने एका वृत्तवाहिनीला दिली आणि अत्यंत कमी शब्दात त्या खूप काही बोलून गेल्या.(MLA late Vinayak Mete's mother laments) त्यांच्या बोलण्याचा रोख आणि हा आरोप कुणावर आहे हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिलेला आहे. या विधानांची मोठी चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी या प्रतिक्रियेचा व्हिडीओ ट्वीट करीत "या मातेची आर्त किंकाळी सरकार ऐकणार का?" असा सवाल उपस्थित केला आहे. पोलिसांनी त्यांचा तपास सुरु केला असून या तपासात काय निष्पन्न होतेय याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 


ज्योती मेटे यांना आमदार करा 

मराठा समाजाचे नेते आमदार स्व. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर घ्यावे आणि आमदार करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. शिवसंग्राम पक्ष भाजपच्या सोबत युतीत आहे, मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नींना आमदार करावे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत ज्योती मेटे यांचा समावेश केला जावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.  



  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !