BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ ऑग, २०२२

शाळकरी मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग !

 


शोध न्यूज : शाळकरी मुलींचा शिक्षकाकडूनच विनयभंग झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आली असून या प्रकरणी या नराधमाला चोपून काढले असून आता त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नवी पिढी घडविणारे शिक्षक हे सदैव आदरासाठी पात्र असतात पण काही शिक्षक आपल्या पवित्र पेशाला कलंक असतात. दारू पिऊन वर्गात आडवे झालेल्या शिक्षकांची काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तर काही शिक्षकांनी विद्यार्थिनीशी नको ते चाळे करताना पकडले जातात. अत्यंत पवित्र आणि आदराचा पेशा असलेला शिक्षक अशा काही मुठभर नालायक मंडळीमुळे बदनाम होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील  माळशिरस तालुक्यातील एका जिल्हा परिषद शिक्षकाने पुन्हा शिक्षणासारख्या पावित्र्याला आणि गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला कलंकित केल्याचे समोर आले आहे. या शिक्षकाचे वर्तन अत्यंत धक्कादायक असल्याची कथा समोर आली असून पालकांच्या भीतीने हा नराधम शिक्षक पसार झाला आहे. 


माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या मुकेश कोळी याच्यावर नातेपुते पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा 'मास्तर' पळून गेलेला आहे. काही दिवसांपूर्वी शाळेत मैत्री दिन साजरा करण्याचा अट्टाहास या शिक्षकाने केला आणि हीच संधी साधून मुलीशी छेडछाड केली. या घटनेने शाळकरी मुली घाबरून गेल्या होत्या आणि त्यांच्या मनात शिक्षकाबद्दल भीती निर्माण झाली होती. या घटनेचा मुलींच्या मनावर एवढा परिणाम झाला होता की, त्याला पाहून या शाळकरी मुली बेंचच्या खाली लपून बसू लागल्या होत्या. शाळेत शिकविणाऱ्या 'गुरुजी' बद्धल मुलींच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. एवढे वातावरण निर्माण झालेले असतानाही या शिक्षकाची सवय काही गेली नाही. 


मुलींच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली असल्याचे लक्षात आले असतानाही पुन्हा या शिक्षकाने आपली पाशवी वृत्ती दाखवून दिली. वर्गात परीक्षा सुरु असताना हा वर्गात आला.  त्याला पाहताच मुली खाली लपून बसल्या. हे चित्र पाहून कोळीचे धाडस मात्र वाढले. मुलींच्या जवळ जात त्याने त्यांना बाहेर येण्यास सांगितले. मुली बाहेर यायला तयार नव्हत्या. परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे सांगतो म्हणून त्याने मुलीना फसविण्याचा प्रयत्न सुरु केला. प्रश्नाची उत्तरे सांगतो असे म्हटल्यानंतरही मुली खालून बाहेर यायला तयार होत नव्हत्या. अखेर हा कोळी मुलींच्या जवळ गेला आणि लगट करू लागला. मुलींच्या खांद्यावर हात ठेवून मोठे धाडस करू लागला. मुलींची धाडसाने त्याला बाजूला होण्यास सांगितले तेंव्हा तो बाजूला झाला आणि पुन्हा दुसऱ्या शाळकरी मुलीचा विनयभंग केला. 

दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली तेंव्हा वर्गातील मुलांना त्याने बाहेर सोडले पण मुलीना मात्र सोडले नाही. हा प्रकार शेजारच्या वर्गातील शिक्षिकांना समजला. शेजारच्या वर्गातील शिक्षिका धावत आल्या पण तो मुलीना बाहेर सोडायला तयार नव्हता. (Girls molested by teacher in Solapur Zilla Parishad school) अखेर या शिक्षिकांनी वर्गाचा दरवाजा उघडून मुलीना बाहेर काढले. यावेळी काही शिक्षिकांनी मिळून या 'मास्तर' ची चांगलीच धुलाई केली अशीही चर्चा आहे. 


पालक संतप्त !

सदर प्रकार मुलींची घरी आल्यावर आपल्या पालकांना सांगितला तेंव्हा पालक प्रचंड संतप्त झाले.  गावकरी आणि पालक शाळेत धडकले आणि जाब विचारू लागले. संतापलेल्या पालकांचा संताप उफाळून आला होता आणि शाळेत एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होती. पालक त्या शिक्षकाचा शोध घेत होते पण हा शिक्षक मात्र वेपत्ता झाला होता. 


पोलीसही धावले !
जिल्हा परिषद शाळेत सुरु असलेला हा प्रकार पोलिसांच्या कानावर जाताच पोलीस अधिकारी शाळेत दाखल झाले. तणावाची बनत असलेली परिस्थिती पोलिसांनी हाताळत गावकरी आणि पालकांना शांत केले. सदर गुरुजीवर कारवाई करण्याचा विश्वास पोलिसांनी दिला. या घटनेने मात्र पालकांत चिंता निर्माण केली असून शाळकरी मुली देखील भयभीत झाल्या आहेत.   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !