BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ ऑग, २०२२

अखेर 'त्या' दुर्दैवी शेतकऱ्याचा मृत्यू !

 



शोध न्यूज : शेताच्या वादातून पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या "त्या" शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला असून या घटनेचा अनेकांच्या मनाला चटका लागला आहे.


शेतीचा, बांधाचा वाद टोकाला जाण्याची अनेक उदाहरणे आहेत, त्यासाठी परस्परांच्या जीवावर उठण्यापर्यंत मजल जाते. भांडण सुरु झाल्यावर त्यात काहीही गैर घडू शकते पण करमाळा तालुक्यातील हिंगणी येथे थंड डोक्याने शेतकऱ्याला जाळून मारण्याची घटना घडली आहे. हिंगणी येथील पन्नास वर्षे वयाचे शेतकरी कानून मोहन बाबर यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला आणि यात ते जबर जखमी झाले आणि रुग्णालयात उपचार घेताना त्यांचा मृत्यूही झाला आहे. तत्पूर्वी पोलिसांनी  चंद्रकांत मच्छिंद्र बाबर, अनिल मच्छिंद्र बाबर, औदुंबर मच्छिंद्र बाबर या  तिघांच्या विरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


'भावकी" हा प्रकार अनेकदा शत्रुत्वाचाच असल्याचे दिसून येते. कानून बाबर याचा जीव देखील भावकीतल्याच लोकांनी घेतला. कानून बाबर आणि त्याच्या भावकीतील लोकांशी शेतजमिनीचा वाद होता आणि या वादातून त्याच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्यात आले. सतत होत असलेल्या वादाचा शेवट मात्र अत्यंत हृदयद्रावक झाला. मयत कानून बाबरचे लग्न झालेले नव्हते, एकटेच ते आपल्या छपराच्या घरात झोपलेले असताना त्यांना पेटवून देण्यात आले. झोपेत असताना ही घटना घडली त्यामुळे बाबर यांच्या शरीराला आगीने लपेटले आणि ते भाजले गेले. त्यांना तातडीने करमाळा येथील उप जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 


गंभीररित्या भाजलेल्या कानून बाबर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी चंद्रकांत मच्छिंद्र बाबर, अनिल मच्छिंद्र बाबर, औदुंबर मच्छिंद्र बाबर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. भाजून जखमी झालेल्या बाबर यांना करमाळा येथून उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले होते पण उपचार सुरु असतांनाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेताच्या वादातून अखेर आणखी एका शेतकऱ्याचा जीव भावकीतील लोकांनीच घेतला. या घटनेने हिंगणी परिसरात हळहळ व्यक्त होत असून अनेकांच्या मनाला ही घटना चटका लावून गेली आहे.   


शेतीच्या कारणावरून भावकीतील वाद किती टोकाला जाऊ शकतो हेच या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. परस्परांचे नातेवाईक असताना देखील थेट पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रकार घडत असल्याचा अनेकांनी निषेध तर केलाच आहे पण ही घटना ऐकून देखील अनेकांना हादरा बसला आहे. (Agricultural dispute,  farmer was killed by pouring petrol ) शेतीचे वाद न्यायालयापर्यंत जातात पण थेट नात्यातील व्यक्तीचा अशा प्रकारे जीव घेण्याचा हा प्रकार प्रचंड धक्कादायक मानला जात आहे.  अशा प्रकारे शेतकऱ्याची हत्या होणे हा मानवतेलाच कलंक लागला आहे.


----- 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !