BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ ऑग, २०२२

ठिणगी पडली ! आमदार नाराज, भाजपातही कलह सुरु !

 



मुंबई : राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होताच नव्या सरकार मध्ये नाराजी आणि कलह सुरु झाला असून काही आमदार नाराज आहेत तर भारतीय जनता पक्षातच अंतर्गत कलहाला सुरुवात झाली आहे.


शिवसेना फोडून एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केले. भारतीय जनता पक्षाचे अधिक आमदार असतानाही देवेंद्र फडणवीस यांना दुखावून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले. यामुळे आधीच भाजपचे नेते वरून दाखवत नसले तरी आतून नाराज आहेत हेच त्यांनी केलेल्या विधानांवरून समोर आले आहे. शिवसेनेचे चाळीस आमदार शिंदे यांच्या नेतृत्वात फुटले आणि नवे सरकार स्थापन केले तरी हे सरकार अधिक काळ टिकू शकणार नाही असे भाजप वगळता सर्वच पक्षातील नेते सांगत आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार महिन्याहून अधिक काळ रखडला आणि आज विस्तार होताच ठिणगी पडली आहे. भाजपचे ९ आणि शिंदे गटाचे ९ अशा एकूण १८ मंत्र्यांचा शपथविधी आज झाला परंतु शिंदे गटातील अनेक आमदार नाराज झाले असल्याची चर्चा लगेच सुरु झाली आहे. 


आजचा विस्तार होण्याआधी शिंदे गटातील आमदारांची एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बोलावण्यात आली होती.  ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही त्यांना समजावले जात होते. यावेळी मंत्रीपद न मिळालेले आमदार संतापले होते असे बाहेर आले आहे. त्यातच शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे संजय शिरसाठ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे आणि त्यांचाच अधिक संताप होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत असतानाच संजय शिरसाट यांनी आपला संताप व्यक्त केल्याची चर्चा आहे. मागचा पुढचा विचार न करता ज्या बंडखोरांनी तुम्हाला मदत केली त्यांच्याच वाट्याला मंत्रीपद नाही, असे शिरसाट म्हणाले आणि यावेळी पाच दहा मिनिटे तणाव निर्माण झाला असल्याचे सांगितले जात आहे.


संजय शिरसाट हे गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि संजय राउत यांच्यावर जोरदार आणि आक्रमक टीका करीत राहिले आहेत त्यामुळे त्यांचे मंत्रीपद निश्चित मानले जात होते पण तसे घडले नाही. आता दुसऱ्या विस्तारात शिरसाट मंत्री होतील का ते पाहावे लागणार आहे. संजय शिरसाट यांनी मात्र आपण नाराज नसल्याचे पुन्हा पुन्हा सांगितले आहे परंतु असे सांगणाऱ्या अनेक आमदारांचे चेहरे मात्र सगळं काही बोलून जाऊ लागले आहेत. अपक्षांना या विस्तारात आजीबात स्थान दिले गेले नाही त्यामुळे देखील अंतर्गत खदखद असून ती अप्रत्यक्षपणे बाहेर येताना दिसू लागली आहे. (MLAs are displeased, conflict is starting in BJP too) 'प्रहार' चे बच्चू कडू यांनी मंत्रीपद सोडून शिंदे गटात जाणे पसंत केले पण त्यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नसून ते शपथविधी सोहळ्यास देखील उपस्थित राहिले नाहीत. 


आपणास अन्य काम असल्यामुळे आपण उपस्थित नव्हतो असे सांगणाऱ्या बच्चू कडू यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवतानाच अप्रत्यक्षपणे इशारा देखील देवून टाकला आहे. 'आपण नाराज नाही पण नाराजी थेट चेहऱ्यावर झळकत आहे. अडचण आहे असे सांगून मंत्रीमंडळात स्थान दिले नाही पण सगळे अपक्ष एकत्र आहेत असे समजू नका' असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलेला आहे. अपक्ष आणि मित्रपक्ष यांना स्थान दिले पाहिजे होते, अपक्ष आणि मित्रपक्ष यांच्यामुळे सरकार बनलेले आहे. महिन्याभरात आणखी मंत्रीमंडळ विस्तार होईल त्यावेळी नक्की विचार केला जाईल असा शब्द देण्यात आला आहे, महिन्याभरात काय होतंय ते पाहू' असे देखील बच्चू कडू यांनी म्हटले आहे. 


भाजप नेत्या संतापल्या !

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्याने भाजपच्याच नेत्या चित्रा वाघ संतापलेल्या आहेत. आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीत संजय राठोड हे मंत्री होते तेंव्हा पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी भाजपच राठोड यांचा राजीनामा मागत होते आणि शिवसेनेने त्यांचा राजीनामा घेतला होता. असे असताना शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्री बनवले आहे. यावर चित्र वाघ संतापल्या असून  'संजय राठोड याला मंत्रीपद देणे हे दुर्दावी आहे, राठोड पुन्हा मंत्री झाला असला तरी आपला त्याच्याविरुद्ध लढा सुरूच राहणार आहे' अशा प्रकारचे ट्वीट वाघ यांनी केले आहे. 


राजीनामा द्या - देसाई 

चित्रा वाघ यांना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी भाजपचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. पूजा चव्हाणला न्याय मिळवून देण्यासाठी केवळ ट्वीट करीत बसण्यापेक्षा भाजपचा राजीनामा द्यावा' असे देसाई यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीत संजय राठोड यांचा राजीनामा भाजपने घेतला आणि आज तेच संजय राठोड पहिल्या रांगेत होते आणि त्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे हे दुर्दैवी आहे. भाजपमध्ये राहून पूजा चव्हाणला न्याय शक्य नाही त्यामुळे भाजपचा राजीनामा द्या असेही देसाई यांनी म्हटले आहे.   


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !