BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ ऑग, २०२२

शहाजीबापू पाटील ना चर्चेत, ना स्पर्धेत ! शपथविधी झाला !

 



मुंबई : शिवसेनेशी मोठी नाराजी ओढवलेले आणि फोन संवादामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे मंत्रीमंडळाच्या विस्तारत स्पर्धेतही राहिले नाहीत आणि चर्चेतही राहिले नाहीत. 


सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे एक  उच्चशक्षित आमदार असून त्यांचे वक्तृत्व सभा जिंकते. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना फोडली आणि यात शहाजीबापू पाटील हे आघाडीवर राहिले आहेत. शिवसेनेतून चाळीस आमदार फुटले असले तरी त्यातील काही आमदार शिवसेनेच्या टार्गेटवर आहेत. कारण या आमदारांनी बंड तर केलेच पण आपल्या वक्तव्याने शिवसेनेला प्रचंड दुखावले आहे. यात शहाजीबापू पाटील, तानाजी सावंत यांचा समावेश आहे. "काय झाडी, काय डोंगर, काय हाटील.. ओक्के" या संवादाने राज्यभरप्रसिद्धी मिळालेले आ. शहाजीबापू पाटील यांनी सतत एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले आणि शिवसेनेला दुखावले. युवा शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्याबाबत तर त्यांनी अत्यंत विखारी भाषेत वक्तव्य केले होते. 


आ. शहाजीबापू पाटील हे रोजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करीत होते. बंड केलेल्या चाळीस आमदारात केवळ शहाजीबापू पाटील यांचीच चर्चा अधिक झाली त्यामुळे मंत्रीमंडळाच्या पहिल्याच विस्तारत शहाजीबापू यांची वर्णी लागेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. शहाजीबापू पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडाचे कौतुक करण्यात थकत नव्हते. (
MLA Shahajibapu Patil is not a minister) बापुना मंत्रीपद तर नाहीच पण त्यांचे नाव चर्चेत देखील राहिले नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.  पहिल्याच विस्तारत शहाजीबापू पाटील हे मंत्री होतील अशी सोलापूर जिल्ह्याला आशा होती आणि खात्रीही होती. प्रत्यक्षात मात्र तब्बल ४० दिवसांनी विस्तार झाला आणि यात शहाजीबापू यांचे नाव आले नाही. विस्ताराच्या स्पर्धेत तर बापू नव्हतेच पण त्यांचे नाव साधे चर्चेत देखील आले नाही. धाराशिवचे तानाजी सावंत यांना मात्र ही संधी मिळाली आहे.            


आज नव्या सरकारचा पहिला विस्तार झाला आणि यात भारतीय जनता पक्षाचे ९ तर शिंदे गटाचे ९ अशा १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. पहिल्या विस्तारात एकही महिला मंत्री नसून पहिल्यांदाच महिला मंत्री नसलेले हे मंत्रीमंडळ आहे. यात अपक्ष आमदारांना देखील स्थान देण्यात आले नाही. शिंदे गटाने बंड पुकारले तेंव्हा अपक्ष आमदारांचा देखील या बंडात समावेश होता. 'प्रहार' चे बच्चू कडू हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते पण त्यांनीही बंडाला पाठींबा दिला होता तरीही त्यांना या विस्तारत स्थान देण्यात आले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शब्द दिला होता परंतु काही अडचणी असतील, अजूनही शिंदे यांच्या शब्दावर आपला विश्वास आहे असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. 


यांनी घेतली शपथ !          

भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे,  अतुल सांवे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा  यांनी तर शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, दादा भुसे, तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपन भुमरे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.  


सोलापूर जिल्ह्याला 'गाजर' !

महिन्यापेक्षा अधिक काळ रखडलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला 'गाजर' आले असून जिल्ह्यातील एकाही आमदारांचे नाव पहिल्या यादीत समाविष्ट झाले नाही.  शिंदे गटातील शहाजीबापू पाटील यांचे नाव तर नाहीच पण भारतीय जनता पक्षाच्याही आमदारांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आले नाही. 


२१ जिल्हे मंत्रीपदाविनाच !

राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यात मंत्रीपदच नाही. एका जिल्ह्यात तब्बल तीन तर एका जिल्ह्यात दोन मंत्रीपदे देण्यात आली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात तीन तर जळगाव जिल्ह्यात दोन मंत्रीपदे देण्यात आली आहेत. 


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !