BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ ऑग, २०२२

आ. शहाजीबापू पाटील नौटंकीबाज, तमाशातील सोंगाड्या !

 



शोध न्यूज : आ. शहाजीबापू पाटील म्हणजे केवळ नौटंकी करणारा तमाशातील सोंगाड्या असून राजकारणात ते फक्त विनोद करू शकतात, मतदारसंघाचे प्रतिनिधित्व नाही असा घणाघात शिवसेनेचे खासदार विनायक राउत यांनी केला आहे. 


शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अपेक्षेप्रमाणे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांना लक्ष्य केले. 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील' या संवादाने प्रसिद्धीला आलेल्या आ. शहाजीबापू पाटील यांची बंडखोरीत मोठी भूमिका दिसून आली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार फुटून गुवाहाटी येथे गेल्यावर त्यांची आपल्या समर्थकाशी बोलतानाचा त्यांचा संवाद अपेक्षेपेक्षा अधिक व्हायरल झाला पण त्याबरोबर शिवसेनेची नाराजी देखील ओढवून घेतली आहे. सांगोल्यात शिवसेनेचे फारसे प्राबल्य नसले तरी आ. पाटील हे थोडक्या मतांनी निवडून आले आहेत आणि त्यांना पुढची निवडणूक ही सोपी राहिली नाही हे उघड आहे. तरीही त्यांनी केवळ बंडखोरीच केली नाही तर शिवसेनेला थेट अंगावर घेतले आहे.

 
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे तसेच शिवसेना यांच्यावर आ. शहाजीबापू पाटील यांनी गेल्या काही दिवसांत बरेच तोंडसुख घेतले आहे त्यामुळे बंडखोरीपेक्षाही अधिक नाराजी त्यांनी आपल्या बोलण्यातून ओढवून घेतली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी जाहीर सभेसाठी संगोल्याचीच निवड केली आहे. त्याआधी त्यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषद घेतली असून येथेही त्यांनी आ. शहाजीबापू पाटील यांनाच लक्ष्य केले. शहाजीबापू पाटील यांच्यासारखा माणूस राजकारणात फक्त नौटंकी करू शकतो पण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. लहान विद्यार्थी देखील 'नॉट ओक्के' म्हणत आहेत तर शिवसेनेला 'विल बी ओक्के' म्हणू लागले आहेत.   


  • सांगोल्याच्या शिवसेना निर्धार सभेत बोलताना खा. राऊत यांनी आ. शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका करताना, 'तमाशातील सोंगाड्या', 'अवदसा', 'नौटंकीबाज' अशा शेलक्या शब्दांचा वापर केला !


खा. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. गोविंदाना देण्यात येणारे आरक्षण आणि ठाण्यातील बॅनरबाजी यावर बोलताना त्यांनी जोरदार प्रहार करून वस्तुस्थिती दाखवून देत सवाल उपस्थित केला. एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारंवार उल्लेख करत असतात. बाळासाहेबांचे विचार आणि त्यांची शिवसेना पुढे नेण्यासाठी बंद केल्याचे ते सांगत असतात. पण ठाण्यात लावलेल्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा लहान आहेत. यावर बरीच चर्चा होऊ लागली असताना विनायक राऊत यांनी देखील हा विषय छेडला आहे. 


"आम्ही कुणाचा दुस्वास करीत नसून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा मान सन्मान आम्ही ठेवतोच पण तुम्ही ठाण्यात लावलेल्या बॅनरवर मोदी आणि शहा यांना मोठे दाखवले आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना छोट्याशा कोपऱ्यात  लपवलं आहे. (MLA Shahjibapu Patil is a gimmick man) यातून तुमचं खरं रूप दिसून येत आहे" असे देखील खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.   


काळू बाळूचा तमाशा 

राज्यात काळू बाळू यांचा तमाशा सुरु आहे अशा शब्दात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. या तमाशात एक दाढीवाला आहे तर दुसरा बिगर दाढीवाला असून हा काळूबाळू यांचा तमाशा सुरु झाला आहे. अशा शब्दात विनायक राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. या तमाशात शहाजीबापू हे सोंगाड्या आहेत अशी खिल्ली त्यांनी उडवली. 


ही एक औदसा !

शहाजीबापू पाटील ही एक औदसा असून ती सांगोला तालुक्याला मिळाली आहे.  ही औदसा घालविण्यासाठी शिवसैनिकांनी आता कामाला लागावे. पाटील हा मिमिक्री करणारा माणूस असून ज्यांना तमाशा काढायचा असेल त्यांनी खुशाल या सोंगाड्याला आपल्या तमाशात घेवून जावे, ते चांगले काम करतील असेही सांगोल्याच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात विनायक राऊत म्हणाले. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !