BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ ऑग, २०२२

एकनाथ शिंदे गटात दोन दिवसातच भ्रमनिरास !


शोध न्यूज : शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झालेले सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी दोनच दिवसात परत फिरले असून पुन्हा ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिंदे गटाकडून आपणास फूस लावली गेल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.  


शिवसेनेला धक्का देत एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार यांनी बाहेरचा रस्ता धरला आणि भाजपशी जवळीक साधून राज्यात सरकार देखील स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेचे बारा खासदारही शिंदे गटात दाखल झाले. शिंदे गट आता शिवसेना आमचीच असल्याचे सांगत असून निवडणूक चिन्हावर देखील त्यांनी दावा केला आहे. अर्थात या बाबी न्यायालयातच ठरणार आहेत तथापि शिंदे गटाने राज्यात पदाधिकारी नियुक्त्या सुरु केल्या असून शिवसेनेत विशेष स्थान नसलेले काही जण शिंदे गटात दाखल होत आहेत. शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरु झाले असल्याचे दाखवले जात असतानाच आपल्याला फूस लावून या गटात नेल्याचे सांगत काही पदाधिकारी पुन्हा परतीच्या प्रवासाला लागत आहेत. सर्वात पहिली घटना पुण्यात समोर आली आणि आता सोलापूर जिल्ह्यात देखील असाच प्रकार समोर आला आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका माजी उपप्रमुख आनंद भक्कानुरे हे शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झाले होते. या घटनेची चर्चा सुरु असतानाच ते दोनच दिवसात परत आले असून आपल्याला फूस लावून शिंदे गटात नेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिंदे गटात गेलेले अनेकजण हळूहळू परत फिरणार आहेत असा अंदाज अनेक जाणकार व्यक्त करीत असताना सोलापूर जिल्ह्यात केवळ दोनच दिवसात पदाधिकारी परत आले आहेत. शिंदे गटात आपला भ्रमनिरास झाला, फूस लावून नेण्यात आले पण दोप्न दिवसातच सगळे काही लक्षात आले म्हणून आपण स्वगृही परत आलो आहोत असे भक्कानुरे यांनी सांगितले. (
Back to Shiv Sena from Shinde group in two days)  शिवसनेचे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ते पुन्हा शिवसेनेत परत आले आहेत. त्यामुळे राज्यातही असेच घडत राहणार काय? असा सवाल आता उपस्थिती होऊ लागला आहे. 


उद्या सुनावणी !
सरकारच्या भवितव्याची उद्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारला काही धोका झाला तर शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झालेल्या अनेकांचा काय निर्णय असणार आहे हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. शिवसेनेशी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले शिवसेनेत थांबलेले आहेत त्यामुळे शिवसेनेला फारसा धोका नसला तरी राज्यातील सत्तेत काही उलटफेर झाला तर मात्र वेगळेच चित्र दिसणार आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !