BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ ऑग, २०२२

अडीच हजारांसाठी ग्रामसेवक आला गोत्यात !

 




शोध न्यूज : अलीकडे ग्रामसेवक मंडळी देखील लाचखोर होऊ लागले असून केवळ अडीच हजाराची लाच घेताना आणखी एक ग्रामसेवक गोत्यात आला असून त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे.


पोलीस, महसूल अशा विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि शिपाईही लाच घेताना सापडतात, एवढेच नव्हे तर यात पोलीस पाटील, कोतवाल यांचा देखील सहभाग आढळून आला आहे. अशातच सांगोला तालुक्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत सांगोला तालुक्यातील ग्रामसेवक सुरेश सुधाकर फासे आणि पंचायत समिती सांगोल्याचे विस्तार अधिकारी श्रावण बाजीराव घाडगे यांना ताब्यात घेण्यात आले. पंधराव्या वित्त आयोगातून केल्या जाणाऱ्या पाईपलाईन कामाचे बिल मंजूर करण्यासाठी पारे येथील ग्रामसेवक फासे याने स्वत:साठी आणि विस्तार अधिकारी श्रावण घाडगे याच्यासाठी अडीच हजाराची लाचेची मागणी केली होती. या प्रकारणात या दोघानाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या ताब्यात घेतले आहे.


सांगोला पंचायत समिती येथे बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे.  पारे ग्रामपंचायतीचे सदस्य असलेल्या तक्रारदारांनी पारे गावातील गोरडवस्ती येथील पाईप लाईचे काम पंधराव्या वित्त आयोगानुसार केले होते. पारे ग्रामपंचायातीस हे काम मिळाल्यानंतर या कामाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सरपंच यांनी लेखी आदेशान्वये तक्रारदार ग्रामपंचायत सदस्यांची नियुक्ती केली होती.त्याप्रमाणे सदर काम पूर्ण झाले आणि त्यानंतर या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी सदर सदस्यांनी पाठपुरावा केला. 


ग्रामसेवक सुरेश फासे याने या बिलावर सही केली आणि सांगोला पंचायत समितीत विस्तार अधिकारी श्रावण घाडगे यांच्याकडे सादर करण्यासाठी एक टक्क्याप्रमाणे दीड हजार रुपये आणि विस्तार अधिकारी घाडगे याच्यासाठी दीड हजार रुपयांची मागणी केली. यात तडजोड होऊन आणि विस्तार अधिकारी याची संमती घेऊन तीन हजार रुपयातील पाचशे रुपये कमी करण्यात आले आणि अडीच हजारावर ही लाच निश्चित करण्यात आली. विस्तार अधिकारी घाडगे याने ही रक्कम ग्रामसेवक फासे याच्याकडे देण्यास सांगितली.  


अडीच हजार रुपयांची लाच देणे ठरल्यानंतर संबंधितानी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. सदर तक्रारीनुसार पडताळणी करण्यात आली आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. यावेळी सदर लाच स्वीकारताना ग्रामसेवक हा रंगेहात पकडला गेला तर सांगोला पंचायत समितीतील विस्तार अधिकारी श्रावण घाडगे यालाही लगेच ताब्यात घेण्यात आले. (Gramsevak caught red-handed while taking bribe) अडीच हजाराच्या लाच प्रकरणी पारे ग्रामसेवक आणि सांगोला पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी या दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने सांगोला तालुक्यात खळबळ उडाली असून शासकीय विभागात हादरा बसला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !