BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ ऑग, २०२२

चोरलेल्या दुचाकीसह चोरट्यांची टोळी गजाआड !

 


पंढरपूर : सोलापूरसह विविध जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणाऱ्या एका टोळीच्या मुसक्या आवळून पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ६७ दुचाकी जप्त केल्या आहेत. अलीकडील काळातील पोलिसांची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. 


घरासमोरून तसेच बँक अथवा दुकानांच्या समोर लावलेल्या दुचाकींची हातोहात चोरी होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे दुचाकी वापरणे देखील आता कठीण झालेले आहे. भरदिवसा भररस्त्यावरून दुचाकींची चोरी होते त्यामुळे दुचाकीमालक कायम दहशतीखाली असतात. पोलीस सतत दुचाकीचोरांना गजाआड करीत असतात तरीही दुचाकीच्या चोऱ्या थांबलेल्या नसून विविध जिल्ह्यात जाऊन चोरटे अशा चोऱ्या करतात हे यापूर्वीही समोर आले आहे. सोलापूर गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि पंढरपूर पोलीस (Pandharpur Crime) यांनी मात्र मोठी कामगिरी केली असून चोरलेल्या दुचाकींसह पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील आठ जणांना अटक केली आहे. या कामगिरीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. 


पंढरपूर शहरातील ज्या भागातून अधिक प्रमाणात दुचाकी चोरीला जातात त्या परिसरात पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने 'नजर' ठेवली होती. दरम्यान टाकळी बायपास रोडच्या परिसरात एक संशयित व्यक्ती दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती या पोलिसांना प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावला आणि यात एक संशयित अडकला. विशालसिंग गिरीधरसिंग राजपूत हा दुचाकी विक्री करण्यासाठी आला आणि पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याला ताब्यात घेवून त्याची आपल्या पद्धतीने चौकशी सुरु केली आणि पुढे पोलिसांच्या हाती 'घबाड' लागले. 

  

सोलापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, बीड आणि अन्य ठिकाणावरून दुचाकी चोरलेल्या असून अन्य दुचाकीचोरांची नावे देखील या चौकशीत उघड झाली आहेत. पोलिसांनी राजपूत याच्यासह लोटेवाडी (सांगोला) येथील प्रशांत दिलीप भोसले, वैभव शंकर लवटे, लखन महादेव पडळकर, पंढरपूर येथील आकाश दीपक खिलारे, पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील संकेत नीलकंठ शिंदे तसेच सांगोला तालुक्यातील कटफळ येथील दीपक परमेश्वर हाके आणि प्रदीप ज्ञानेश्वर शेळके यांना अटक केली असून आणखी काही आरोपी अटक केली जाण्याची शक्यता आहे. 


दुचाकींची चोरी करून, त्यांची मिळेल त्या किमतीला विक्री करून आलेल्या पैशावर मौजमजा करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील पाच जण सांगोला तालुक्यातील तर तीन जण पंढरपूर तालुक्यातील आहेत. पोलिसांनी अत्यंत परिश्रम घेवून त्यांना अटक केली आणि त्यांच्याकडून सुमारे २१ लाख ३० हजार रुपयांच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पंढरपूर शहरात दुचाकींच्या चोऱ्या वाढल्याने पोलिसांनी तीन पथके तयार केली होती. सदर चोरट्यांनी सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, बीड इत्यादी जिल्ह्यात दुचाकींच्या चोऱ्या केल्या आहेत. (Gang of thieves arrested with stolen bike)सर्वाधिक चोऱ्या या सोलापूर जिल्ह्यातच करण्यात आल्या असून पोलीस आणखी चोरांचा शोध घेत आहेत.  या मोठ्या कामगिरीबाबत पोलिसांचे कौतुक होताना दिसत असून नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे. 


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !