BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ ऑग, २०२२

म्हणे, सोलापुरातील गणपती रडू लागला !



शोध न्यूज : दूध पिणारा गणपती आज रडू लागला आणि भाविकांनी मंदिरात एकच गर्दी केली. विज्ञान युगातही सोलापुरात आज असा प्रकार पुन्हा पहायला मिळाला!


काही वर्षांपूर्वी गणपती दूध पीत असल्याची बातमी पसरली  आणि त्या बातमीच्या वावड्या हवेत भलत्याच उंच  उंच गेल्या.  मुंबईपासून गावातील वाडीवस्त्यावरील गणपती दूध प्यायला लागले होते. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी  यांच्या हाताने देखील मुंबईचा गणपती दूध पिऊ लागला होता. अचानक हा प्रकार समोर आला आणि प्रत्येक गणपती मंदिरात तुडुंब गर्दी झाली होती. जो तो आपल्या हातात दुधाचे भांडे घेवून येत होता आणि गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाला लावत होता. संपूर्ण दिवसभर राज्यभरात या घटनेने खळबळ उडवून दिली होती. अखेर शास्त्रीय कारण समोर आले आणि गणपती मंदिराच्या समोर झालेली गर्दी हळूहळू कमी झाली. त्यावेळी गणपती दूध पिल्याचा प्रकार होता तर आज सोलापुरात गणपती रडू लागल्याचा प्रकार बहुचर्चित ठरला. 


झाड रडू लागले, देवाच्या मूर्तीने प्रसाद खाल्ला, गणपतीने दूध पिले अशा प्रकारच्या अनेक वावड्या उठतात आणि मग देवभोळ्या व्यक्तींचा यावर विश्वास बसतो. वास्तविक अशा घटनामागे काही ना काही शास्त्रीय कारण असते आणि ते समोर येतेही पण तोपर्यंत बरेच काही घडून गेलेले असते आणि अंधश्रद्धा ऐन भरात आलेली असते. सोलापुरात आज होटगी कुंभारी रस्त्यावर एका मंदिरात गणपती रडत असल्याची बातमी पसरली आणि भाविकांनी गर्दी करणे सुरु केले. श्री गणेशाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे तोच आज ही बातमी पसरली गेली.

  
नेहमी शांत शांत असलेल्या गणपती मंदिरात अचानक भाविकांची गर्दी वाढू लागली. अचानक अशी गर्दी का होऊ लागली याचे कोडे अनेकांना पडले. उत्सुकतेपोटी आणखी काही लोक मंदिराकडे गेले तर ही चकित करणारी बाब निदर्शनास आली. मंदिरातील गणपती रडत असल्याचे एका भाविकाने सांगितले. यामुळेच भाविकांची येथे गर्दी होऊ लागल्याची माहिती पुढे आली. ज्याच्या कानावर ही बातमी जाईल तो मंदिराकडे यात होता आणि उत्सुकतेने गणपतीच्या डोळ्यांकडे पहात होता. ही बातमी आजूबाजूच्या गावात पसरायला वेळ लागला नाही आणि मग तेथूनही लोक मंदिराकडे येवू लागले. हार नारळ घेवून भाविक दर्शनासाठी येत राहिले.  


ही केवळ अफवा !
गणपतीच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याची बाब ही केवळ अफवा असून या मागचे शास्त्रीय कारण शोधल्यानंतर सत्य समजणार आहे. (
Ganapati crying, devotees crowded in the temple) अशा घटनांवर विश्वास ठेवू नका असे अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी करून देखील भाविकांची गर्दी होतच राहिली. 


तेंव्हा आणि आता --

काही वर्षांपूर्वी गणपती दूध प्यायला लागल्याची बातमी आली आणि सगळीकडे ती पसरली. गावोगावी प्रत्येक मंदिरात लोक जमा झाले होते आणि आपले दूध गणपती पितोय का हे पहात होते. राज्यातील प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवर हाच प्रकार सुरु झाला होता. आज मात्र हा प्रकार सोलापूरपुरताच मर्यादित राहिला. गोवोगाव हे लोण दिसून आले नाही. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !