BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ ऑग, २०२२

श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

 



शोध न्यूज : सोलापूर जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष श्रीकांत देशमुख याचा जामीन अर्ज अखेर सोलापूर जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे ते उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. 


भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून केवळ सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर राज्यभर गाजत आहे. एका महिलेसोबत देशमुख  याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि या व्हिडीओत सदर महिला श्रीकांत देशमुख याच्याकडे बोट करून 'या माणसाने मला फसविले आहे' असे सांगत होती. या व्हिडीओने राज्यात एकच खळबळ उडवून दिल्यानंतर लगेचच आणखी एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यातील संवादातून देशमुख आणि सदर महिला यांच्यातील प्रकरण सविस्तरपणे जनतेसमोर आले. यात देशमुख याला आपल्या पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. 


देशमुख याच्या कथित कृत्याबाबत राजकारणात पडसाद उमटू लागले आणि सदर महिलेने देखील समोर येत पुण्याच्या पोलीस ठाण्यात आपली फिर्याद दिली. पोलिसांनी या महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तो सोलापूर पोलिसांकडे वर्ग केला. गुन्हा दाखल झाल्यामुळे श्रीकांत देशमुख  याला अटक होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर देशमुख याला काहीसा दिलासा मिळाला आणि ठराविक मुदतीपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आज अंतिम सुनावणी होऊन जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.  अविवाहित महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केले आणि तिची फसवणूक केल्याचा महिलेचा आरोप आहे.  


आज जिल्हा न्यायालयात या प्रकरणातील सुनावणी झाली परंतु देशमुख यावेळी न्यायालयात उपस्थित नव्हते. जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदिपसिंग राजपूत यांनी युक्तिवाद करताना विविध निवाडे दिले, सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अटकपूर्व जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. देशमुख याने पिडीत महिलेचे काही अश्लील व्हिडीओ बनवले आहेत का ? त्याने काही फोटो काढले आहेत काय? याचा तपास करणे आवश्यक असून ते जप्त करण्यासाठी त्याला जामीन देण्यात येवू नये असा युक्तिवाद ॲड. प्रदिपसिंग राजपूत यांनी केला. हा युक्तिवाद मान्य करून देशमुख याचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्यात आला. त्यामळे पुन्हा एकदा देशमुख याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

 
असा होता युक्तिवाद !
सरकारी वकील ॲड. प्रदिपसिंग राजपूत यांनी जोरदार युक्तिवाद केला. महिलेवर दुष्कर्म केलेल्या देशमुख याने भारतीय जनता पक्षाची फसवणूक आणि बदनामी केली. ज्या पक्षाने आदिवासी महिलेला राष्ट्रपती केले, त्याच पक्षाला श्रीकांत देशमुख याने फसवले. विवाहित असताना देशमुखने अविवाहित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि पत्नीची देखील फसवणूक केली. अनैर्सागिक अत्याचार करण्याचा अधिकार पतीलासुद्धा नसतांना देशमुख याने पिडीत महिलेसोबत अनैसर्गिक अत्याचारी कृत्य केले. असे काही मुद्दे न्यायालयात महत्वाचे ठरले. 


अपील करणार !
आजच्या सुनावणीवेळी देशमुख न्यायालयात उपस्थित नसला तरी त्याच्या वकिलाने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. (Srikant Deshmukh's pre-arrest bail application rejected) अटकपूर्व जामिनासाठी देशमुख उच्च न्यायालयात जाणार असल्याने येत्या २६ ऑगस्टपर्यंत अटकेपासून अभय मिळाले आहे. २६ ऑगस्ट पर्यंत देशमुख याला अटक करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !