BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ ऑग, २०२२

पेट्रोल टाकून शेतकऱ्याला पेटवले !

 



शोध न्यूज : शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे.


शेतकरी विविध समस्यांच्या विळख्यात सतत अडकलेला असतोच पण शेजारी शेतकरी बांध कोरतो, चोरपावलाने अतिक्रमण करतो, शेती कसण्यात अडथळे आणतो, बांधाच्या हद्दीवरून वाद उपस्थित होतो आणि न्यायालयात प्रकरण गेले तर वर्षानुवर्षे निकालाची प्रतीक्षा करीत बसतो असे अनेक प्रश्न सामान्य शेतकऱ्यापुढे असतात. गरीब शेतकरी असला की त्याला भरडले जाते आणि कित्येकदा या त्रासामुळे शेतकरी आपली शेती विकून टाकतो.  सामान्य शेतकरी गावगुंडाच्या दहशतीत शेती करूच शकत नाही असे अनेकदा समोर आले आहे. अशा परिस्थितीत करमाळा तालुक्यात अत्यंत भयानक घटना समोर आली असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


शेतजमिनीच्या कारणावरून एका शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याचा खून करण्याचा पर्यंत करण्यात आल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात घडली असल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  करमाळा तालुक्यातील हिंगणी येथील हा धक्कादायक प्रकार आहे. हिंगणी येथील पन्नास वर्षे वयाचे शेतकरी कानूर मोहन बाबर यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला आणि यात ते जबर जखमी झाले. चंद्रकांत मच्छिंद्र बाबर, अनिल मच्छिंद्र बाबर, औदुंबर मच्छिंद्र बाबर या हिंगणी येथील तिघांच्या विरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कानुर बाबर आणि चंद्रकांत बाबर हे एकमेकांचे नातेवाईक आहेत पण त्यांच्या शेतीच्या कारणावरून वाद आहे. यातूनच ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी कानुर बाबर यांच्या अंगावर थेट पेट्रोल टाकण्यात आले आणि त्यांना पेटवून दिले गेले. पेट्रोल ओतून पेटवल्याने क्षणार्धात त्यांच्या शरीराला आग लागली आणि त्यांनी प्रचंड आरडाओरडा केला. कुणीतरी वाचवावे म्हणून त्यांनी आकांत सुरु केला. आजूबाजूच्या लोकांनी येथे धाव घेत बाबर यांच्या शरीराला लागलेली आग विझवली आणि त्यांना करमाळा येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सदर प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


शेतीच्या कारणावरून तीन शेतकऱ्यांनी एका शेतकऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. शेतीच्या वाद किती टोकाला जाऊ शकतो हेच या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. परस्परांचे नातेवाईक असताना देखील थेट पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रकार घडत असल्याचा अनेकांनी निषेध तर केलाच आहे पण ही घटना ऐकून देखील अनेकांना हादरा बसला आहे. (The farmer was set on fire by pouring petrol) शेतीचे वाद न्यायालयापर्यंत जातात पण थेट नात्यातील व्यक्तीचा अशा प्रकारे जीव घेण्याचा हा प्रकार प्रचंड धक्कादायक मानला जात आहे.    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !