BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ ऑग, २०२२

'साहेब, खून झालाय' ! पट्ठ्याने पोलिसांनाच घातली 'टोपी' !


 

शोध न्यूज : 'साहेब, खून झालाय' असा एक फोन करून पट्ठ्याने पोलिसांनाच टोपी घातली आणि मग पोलिसाने त्याची चांगलीच जिरवली असल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात घडली आहे.


अडचणीच्या वेळेस नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून पोलिसांशी संपर्क करण्यासाठी ११२ क्रमांकाची फोनची सुविधा मोफत असते. पण काही माथेफिरू अनेकदा पोलिसांना या मोफतच्या क्रमांकावर फोन करून त्रास देत असतात, खोटी माहिती देवून विनाकारण पोलिसांची धावपळ करीत असतात. आलेल्या फोननुसार पोलिसांना संबधित ठिकाणी धावत जावे लागते आणि तेथे गेल्यावर मिळालेली माहिती ही खोटी होती आणि फोन देखील बनावट होता हे समोर आल्याची अनेक प्रकरणे आजवर घडली आहेत. साधारणपणे असे फोन करणाऱ्या व्यक्ती या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किंवा माथेफिरू असतात. कुणी उगीच गंमत म्हणून असा प्रकार करतात. अर्थात हे लोक पकडले जाऊन पोलीस त्यांना चांगलाच इंगाही दाखवत असतात. करमाळा तालुक्यात अशीच एक घटना समोर आली आहे. 


'साहेब, धायखिंडी येथे एक खून झाला आहे' असा फोन करमाळा पोलिसांना आला. खुनासारखी गंभीर घटना घडल्याचे समजताच पोलीस अधिक सतर्क झाले आणि करमाळा तालुक्यातील धायखिंडी गावाकडे धावले. गुन्ह्याचे वाढते प्रमाण आणि पोलिसांची मर्यादित संख्या यामुळे पोलिसांची आधीच दमछाक सुरु असते, त्यात खून झाल्याचा फोन आल्यामुळे हातची कामे सोडून पोलिसांना हे गाव गाठावे लागले. कुणाचा आणि कशासाठी खून करण्यात आला ? कुणी केला? याची काहीच माहिती पोलिसांपर्यंत पोहोचलेली नव्हती. धावतपळत पोलीस धायखिंडी येथे पोहोचले. गावात जाऊन पोलिसांनी चौकशी केली पण त्यांना या घटनेबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. गावात प्रत्यक्षात कुणाचाही खून झाला नसल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. 


गावात सगळीकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना आलेला फोन हा खोटा होता आणि कुणीतरी मुद्दाम खोटी माहिती पोलिसांना दिली असल्याचे दिसून आले. (Fake call to the police about murder)  न झालेल्या खून प्रकरणी पोलिसांना मात्र अकारण धावाधाव करावी लागली होती.  ११२ क्रमांकाचा वापर करून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला आणि करमाळा येथील देवीचा माळ येथे राहणाऱ्या रोहन दिलीप सोरटे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे या तरुणाने मोबाईलवरून पोलिसांना असा खोटा फोन केला होता, आपण सहज पकडले जाऊ याचा विचार देखील त्याच्या मनात कसा आला नसेल याचेच आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांना खोटा फोन करून 'टोपी' घालण्याचा केलेला प्रयत्न या तरुणाच्या आता चांगलाच अंगलट आला आहे. 


सहा वर्षे शिक्षा !

पोलिसांना खोटा फोन करून त्रास दिल्याच्या प्रकरणी नुकतेच एका महिलेस सहा वर्षांचा कारावास आणि दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. गोंदियात एका महिलेने ११२ क्रमांकावर फोन करून 'साहेब, माज्या मुलाचा खून झालाय' अशी खोटी माहिती दिली होती आणि विशेष म्हणजे तब्बल ११० वेळा या महिलेने पोलिसांना असा खोटा फोन केला होता. पोलिसांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचे नमूद करीत न्यायालयाने या महिलेस सहा वर्षे तुरुंगवासात पाठवले आहे.     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !