BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ ऑग, २०२२

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू !

 



पंढरपूर : तालुक्यातील खरसोळी येथील एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला असून शेतातील विद्युत पंप सुरु करण्यासाठी ते आपल्या शेतात गेले असताना ही दुर्घटना घडली आहे.


विद्युत पंप सुरु करताना शॉक बसून शेतकरी मृत्युमुखी पडण्याच्या घटना सतत घडत असून अलीकडे अशा घटनात वाढ झाली असल्याचे दिसत आहे. कधी विद्युत वितरण कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे तर कधी शेतकऱ्याने दक्षता न घेतल्याने असे प्रकार घडत आहेत. अधूनमधून अशा घटना घडत असताना देखील पुरेशी दक्षता घेण्यात येत नसल्याचेच दिसत आहे. पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील ४५ वर्षे वयाचे शेतकरी नागेश आसबे यांचा विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेल्यानंतर विजेचा शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला असून (Farmer dies due to electric shock) त्यांच्यावर खरसोळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 


प्राप्त माहितीनुसार शेतकरी नागेश आसबे हे दुपारच्या वेळेस आपल्या शेतात गेले आणि पिकांना पाणी देण्यासाठी विजेवर चालणारी मोटार सुरु करण्याचा प्रयत्न करू लागले. विद्युत मोटारीच्या बटण दाबण्यासाठी पेटीचे कुलूप उघडू लागले आणि याचवेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेच्या खांबावरून पेटीपर्यंत येणाऱ्या वायरमध्ये काही दोष निर्माण झाला असल्याचे हा शॉक बसला असल्याचे सांगितले जात आहे.  विजेचा जोरदार धक्का बसल्यामुळे नागेश आसबे हे तेथेच कोसळले परंतु आसपास कुणी नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. शेतात ते एकटेच असल्याने या घटनेची माहिती कुणालाच मिळाली नाही. दुपारी शेतात गेलेले नागेश आसबे हे रात्रीपर्यंत घरी न आल्याने घरात चिंता व्यक्त होऊ लागली. नागेश यांचे बंधू रमेश हे त्यांचा शोध घेण्यासाठी शेताकडे गेले. 


रमेश हे नागेश यांना शोधत नदीच्या काठावर पोहोचले असता शेताजवळ रस्त्यालगत त्यांची दुचाकी आणि चप्पल दिसून आली, रमेश यांनी तेथून पुढे जाऊन पाहणी केली असता नागेश हे जमिनीवर पडले असल्याचे दिसले. विजेचा धक्का लागून ते कोसळले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती गावात कळताच प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात आली. परिसरात या दुर्घटनेची माहिती मिळाली तेंव्हा परिसरातील शेतकरी चिंता व्यक्त करताना दिसले.  


शेतीपंपासाठी खरसोळी परिसरात सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत विद्युत पुरवठा केला जातो पण दुपारी दोन वाजले तरी देखील स्वयंचलित पंप सुरु झाला नव्हता. मोटार का सुरु झाली नाही हे पाहण्यासाठी म्हणून नागेश आसबे हे दुचाकीवरून नदीकाठावरील विद्युत मोटारीकडे गेले होते. ते सायंकाळ झाली तरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मोबाईल उचलला जात नव्हता. जेंव्हा त्यांचा शोध घेणे सुरु झाले तेंव्हा ते विद्युत पुरवठ्याच्या पेटीजवळ मृतावस्थेत दिसून आले. पेटीच्या जवळच विद्युत पुरवठ्याची वायर तुटलेल्या अवस्थेत दिसून आली. तुटलेल्या वायरमधून विजेचा प्रवाह पेटीत उतरला आणि याच पेटीला हात लागताच नागेश आसबे यांना विजेचा धक्का बसला. 


सदर दुर्घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि पंचनामा करण्यात आला. मयत शेतकरी नागेश आसबे हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष होते.   



  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !