BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ ऑग, २०२२

महाराष्ट्राला आता आणखी एक 'मुख्यमंत्री' !

 


पुणे : महाराष्ट्राला आता आणखी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिळाले असून मुख्यमंत्री यांच्या आगमनाच्या आधीच ते पुण्यात अवतरले आहेत.


शिवसेना फोडून एकनाथ शिंदे हे भाजपच्या मदतीने महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आणि एक महिन्याच्या कालावधीत हा चेहरा महाराष्ट्राच्या परिचयाचा झाला. सातारा जिल्ह्यातील एकनाथ शिंदे हे ठाण्याचे निवासी असून प्रदीर्घ काळ राजकारणात आणि मंत्रीपदावर देखील आहेत पण मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा संपर्क पूर्ण महाराष्ट्राशी आला असून राज्यभर हा चेहरा सर्वांच्याच परिचयाचा झाला आहे. पृथ्वीवर अगणित माणसांची गर्दी आहे पण एकाचा चेहरा दुसऱ्या सारखा नसतो. (Same to Same) तरीही जगात एकसारख्या चेहऱ्यांची सात माणसं असतात असं म्हटलं जातं ! अनेकदा परस्पर चेहऱ्याशी साधर्म्य असलेली माणसं आढळून येतात आणि मग त्याचे सर्वांनाच कुतूहल वाटतं ! असाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी एक व्यक्ती समोर आली असून लोक त्यांना एकनाथ शिंदे असल्याचेच मानू लागले आहेत.

 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे हुबेहूब दिसणारी एक व्यक्ती आहे. विजयराजे माने असे या व्यक्तीचे नाव असून अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच झेरोक्स असल्याएवढे साम्य दोघांत आहे. चेहऱ्यावरची दाढी, कपाळावर लावलेला टीळा, पांढरी पॅण्ट आणि पांढरा शर्ट, एवढेच नाही तर एकनाथ शिंदे वापरतात तसाच चष्मा यामुळे ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यासारखे भासतात. (Duplicate Chief Minister Eknath Shinde landed in Pune) जवळून जाणारे लोक त्यांना फसतात, त्यांचा पाठलाग करून त्यांच्यासोबत सेल्फी सुद्धा घेतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना भेटल्याचा आभास या लोकांना होतोय !


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या पुण्यात येत असून मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच पुणे दौरा आहे. त्यांच्या हस्ते उद्या फुटबॉल मैदानाचे उदघाटन होणार आहे. या दौऱ्यात ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन महाआरती देखील करणार आहेत. पण शिंदे यांच्या दौऱ्याआधीच त्यांचे हे डुप्लिकेट पुण्यात अवतरले असून पुणेकरांना त्यांचे मोठे कौतुक आणि अप्रुप वाटू लागले आहे.  त्यांना पाहणारे एकदम दचकतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आले आहेत असा आभास होत आहे. यामुळे पुणेकरांना एक वेगळीच गंमत आणि कुतूहल अनुभवायला मिळत आहे.  लोक त्यांच्यासोबत फोटो घेत आहेत आणि गंमत म्हणजे आपल्या मागण्यांची निवेदने देखील विजयराज माने यांच्याकडे दिली जात आहेत. 


आपण जेथे जातो तेथे लोक आपल्यासोबत फोटो घेत आहेत आणि सामान्य पुणेकर आपल्याकडेच मागण्यांचे निवेदन देत आहेत. फोटो काढण्यासाठी तर लोकांचा मोठा आग्रह असतो. असे विजयराज माने यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवशी आपल्या घरांच्या बाहेर मोठी गर्दी करण्यात आली होती अशी माहितीही माने यांनी दिली.  विजयराज माने हे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या पुण्यात येत आहेत आणि त्याच्या आदल्याच दिवशी हे डुप्लिकेट एकनाथ शिंदे पुण्यात अवतरले असून पुणेकरांना चर्चेला देखील हा एक वेगळा विषय मिळाला आहे.    




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !