BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ ऑग, २०२२

वाकडे बोलणे बंद करा नाही तर ------, आ. शहाजीबापू संतापले !



पंढरपूर : 'काय झाडी, काय डोंगार' म्हणणारे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील हे आता चांगलेच संतापले असून 'वेडेवाकडे बोलणे बंद करा नाही तर --' असा सज्जड इशाराच त्यांनी युवा शिवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना दिला आहे. 


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील चाळीस आमदारांचा गट शिवसेनेतून फुटला आणि भाजपाला मिळाला. त्यानंतर राज्यात या गटाने भाजपसोबत सत्ता मिळवली. अर्थात नवे सरकार अजूनही गॅसवर असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. शिवसेनेच्या आमदारांसह बारा खासदार देखील शिंदे गटात सहभागी झाला आहे.  हा सर्व प्रकार शिवसेनेच्या जिव्हारी लागलेला असून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तर महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. शिवसेना फोडलेल्या चाळीस आमदारांचा गद्दार म्हणून सतत उल्लेख केला जात आहे आणि उल्लेख देखील या बंडखोर आमदारांना टोचत आहे. सांगोला येथील शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हे एकनाथ शिंदे यांच्या बंडात अग्रभागी होते हे पुन्हा पुन्हा दिसून आले आहे. त्यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या टीकेला वेळोवेळी आ. पाटील यांनी दिले आहे. 


युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे सांगोला मतदार संघात देखील येणार आहेत आणि सांगोल्यात आल्यावर ते शहाजीबापू पाटील यांच्यावर तोंडसुख घेणार हे उघडच आहे. त्यापूर्वीच शहाजीबापूनी आदित्य ठाकरे याना इशाराच देऊन टाकला आहे. यामुळे हा संघर्ष आता अधिक भडकणार याचे संकेत मिळू लागले आहेत. ठाकरे कुटुंबाचा आम्ही आदर करतो, आम्हाला 'मातोश्री' बद्धलही प्रेम आहे, त्यामुळेच आम्ही ऐकून घेत आहोत पण आता वेडेवाकडे बोलणे बंद झाले नाही तर मात्र आम्हालाही उलट्या बाजूने उत्तर द्यावे लागेल असा रोखठोक इशाराच आ. शहाजीबापू पाटील यांनी दिला आहे. यावरून यापुढे शहाजीबापू कसलाही मुलाहिजा न बाळगता माणदेशी चपराक देणार असल्याचेच संकेत मिळत आहेत. 


आदित्य ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर असताना जातील तेथे गद्दार असा पुन्हा पुन्हा उल्लेख करीत 'गद्दार आमदारांनी हिंमत असेल तर राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे' असे आव्हान देत फिरत आहेत. त्यांची भाषा देखील कडक येऊ लागली असून चाळीस आमदारांना ती 'लागत' असल्याचे दिसत आहे पण शहाजीबापू यांनी मात्र यावर अत्यंत थेट भाष्य केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच तोंडी 'ठाकरी' भाषा शोभत होती, कुणी पोराने ती वापरू नये, कॉपी करून पुढे येत असलेले डुप्लिकेट नेतृत्व टिकत नसते असा सणसणीत टोला आ. शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे.  (MLA  Shahajibapu Patil attack on Aditya Thackeray)  

 

कोणतेही नेतृत्व ज्याच्या त्याच्या नैसर्गिक गुणातून घडत असते, जगभरात कोणतेही डुप्लिकेट नेतृत्व टिकलेले नाही,  वारसा म्हणून आलेले नेतृत्व शिवसैनिकांनी स्वीकारले, आदित्य सारख्या लहान पोराने ठाकरी भाषा वापराने योग्य होणार नाही. ते ज्या आमदारांवर टीका करतात ते सगळे आमदार वयाने मोठे असून मोठ्या माणसांना कसे बोलावे याचे संस्कार घरातून झालेले नाहीत काय ? असा तिखट सवाल आ. पाटील यांनी विचारला आहे.  


आदित्य ठाकरे हे केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू म्हणून राज्यात फिरत आहेत पण ते लोकमताचे नेतृत्व नाहीत. त्यांच्या नावातील ठाकरे हा शब्द बाजूला केला तर त्यांच्या सभेला पन्नास लोक सुद्धा येणार नाहीत. गद्दार, गद्दार म्हणायचे आणि पुन्हा परत या देखील म्हणायचे, कुणीही येणार नाही तुमच्याकडे! आता आमच्याकडे तुमचे काय काम आहे ? अशा शब्दात बापूनी आदित्य ठाकरे याना फटकारले आहे. 


'धनुष्यबाण' आमचाच !

धनुष्यबाण आमचाच असून शिवसेना- भाजप युती म्हणून आम्ही सर्व निवडणूक लढविणार आहोत. आमच्या पोस्टरवर उद्धव ठाकरे यांचा नव्हे तर एकनाथ शिंदे यांचाच फोटो असणार आहे. धनुष्य बाण या चिन्हांवरच आम्ही निवडणूक लढविणार असून त्यांना पाहिजे असेल तर त्यांनी ढाल तलवार हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी. घ्या चिन्ह आणि या मैदानात असे आव्हानच शहाजीबापू यांनी दिले आहे. पहिल्यांदाच पाटील यांनी एवढी टोकाची भाषा वापरली असल्याचे दिसत आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !