BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ ऑग, २०२२

नकली 'आर्मी ऑफीसर' कडून होतेय फसवणूक !

 


सोलापूर : वाढत्या तंत्रज्ञानासोबत फसवणुकीचे प्रकारही वाढलेले असून सैन्य दलातील नकली अधिकारी बनून देखील फसविण्याचा नवा फंडा समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याच्या सूचना सायबर पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.


आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने एक वेगळी क्रांती घडली आहे पण विज्ञान हे शाप आहे की वरदान असा प्रश्न पडावा अशा अनेक घटना रोज घडत आहेत आणि त्या वाढत देखील आहेत. त्यासाठीच सायबर पोलिसांचा विभाग कार्यरत झाला आहे. कोण आणि कशा पद्धतीने कुणाची फसवणूक करील याचा काहीच भरोसा राहिला नसून बँकेतील पैसा देखील गायब होऊ लागला आहे. रस्त्यावर पोलीस असल्याची बतावणी करीत दिवसा ढवळ्या लूट केली जात आहे. ऑनलाईन फसवणुकीने तर ताळतंत्र सोडले आहे. 


एखादी चूक देखील लाखो रुपयांना पडू लागली आहे. रोज नवे नवे प्रकार शोधले जात आहेत आणि त्यामुळे लोक मोठ्या फसवणुकीची शिकार होत चालले आहेत. सैन्यातील अधिकारी असल्याचे सांगून देखील मोठ्या शहरात फसवणूक होत असल्याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी करून बँकेतील खाते रिकामे केले जात आहे. अशी फसवणूक टाळण्यासाठी सायबर सेलचे फौजदार अविनाश नळेगावकर यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. 


आपण आर्मी ऑफिसर असल्याचे सांगून फोनवरूनच भाड्याने घर पाहिजे असल्याचे सांगितले जाते, कधी आरोग्य तपासणी शिबीर घेण्याची बतावणी करीत बँक खात्यातून रक्कम गायब केली जात आहे. असे प्रकार आता वाढलेले असून सायबर पोलिसांनी नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केले आहे. आपली व्यक्तिगत माहिती कुणालाही देवू नका आणि अनोळखी माणसाने सांगितले असल्यास कुठलेही ऍप मोबाईलवर डाऊनलोड करून घेऊ  नका असा सल्लाही देण्यात आला आहे. 


समाजमाध्यम तर फसवणुकीचे प्रमुख केंद्र बनले असून अनेकांची फसवणूक होत आहे. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट केली जाते, त्यानंतर बनावट आधारकार्ड, सैन्यातील खोटे ओळखपत्र, नकली पॅन कार्ड पाठवले जाते. सहजासहजी विश्वास बसेल अशा बतावण्या केल्या जातात आणि चॅटिंग करून, व्हिडीओ कॉलवरून संवाद सुरु असतानाच गुगल तसेच फोन पे द्वारे रक्कम भरण्यास सांगतात. ही हुशारी एवढी बेमालूम असते की कुणीही सहज त्यांना बबळी पडू शकतो.   


पाच दहा रुपये पाठवले की तो दहा रुपये परत पाठवतो त्यामुळे सहज विश्वास बसतो. 'एनी डेस्क' हे ऍप असे आहे की त्याद्वारे आपल्या मोबाईलचे नियंत्रण त्याच्याकडे जाते आणि मोबाईल डाटा ते हॅक करतात. काही क्षणात आपला बँक खात्यावरील रक्कम ते त्यांच्याकडे वळती करून घेतात. यासाठी सावधगिरी बाळगणे हाच उपाय आहे अन्यथा फसवणूक अटळ आहे.  अशा व्यक्तीला कसलीही माहिती दिली जाऊ नये तसेच अनोळखी फोन कॉलवर कसलाही विश्वास ठेवू नये. कुठलीही शासकीय यंत्रणा आपली व्यक्तिगत माहिती मागत नसते. (Cheating by fake army office) क्यू आर कोड हा पैसे पाठविण्यासाठीच वापरला जातो, रक्कम स्वीकारण्यासाठी या कोडची गरज नसते याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. असा काही प्रकार घडत असल्यास त्वरित सायबर सेलकडे माहिती दिली गेली पाहिजे.  


सैन्यातील अधिकारी आहोत असे सांगून फसविण्याचा नवीनच फंडा अलीकडे अनेकांना गंडा घालू लागला आहे. सैन्यातील अधिकारी आहे असे म्हटले की प्रत्येकाला आदर वाटतो आणि त्याच्यावर विश्वास देखील पटकन ठेवला जातो. याचाच गैरफायदा उठवला जात आहे. आपण आर्मी ऑफिसर आहोत आणि आपल्या मुलासाठी खाजगी ट्युशन लावायची आहे, आरोग्य शिबीर आयोजित करायचे आहे, आर्मी ऑफिसर साठी काही वस्तूंची खरेदी करायची आहे, पण त्यासाठी भारतीय चलन आमच्याजवळ नाही. आमच्याकडे अमेरिकन डॉलर आहेत. तुम्ही मला भारतीय चलन पाठवा, आम्ही तुम्हाला अमेरिकन डॉलर पाठवतो असे अत्यंत विश्वासपूर्वक सांगितले जाते. सैन्य दलातील अधिकारी असल्याने चांगल्या भावनेने काही जण मदत करण्यासाठी पुढे सरसावतात आणि तिथेच फसतात. 


जीएसटी, कस्टम ड्युटी अशी रक्कम भरावी लागते असे सांगून आपल्याकडून हे भामटे रक्कम भरून घेतात. आपली सगळी माहिती आपल्याकडूनच घेतात आणि त्याच्याच आधारे आपल्याला फसवतात. पैसे देण्याची प्रक्रिया सुरु असते तोपर्यंत ते संवाद साधत राहतात आणि एकदा पैसे देण्याचे बंद झाले की त्यांचा संवाद बंद होतो. फोन बंद करून नंतर ते कसलाही प्रतिसाद देत नाहीत आणि तोपर्यंत मोठी फसवणूक झालेली असते. त्यामुळे अनोळखी व्यक्तीपासून दूर राहणे हीच सर्वात मोठी सावधगिरी ठरणार आहे.  

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !