BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ ऑग, २०२२

एका बिडीने घेतला शेतकरी कुटुंबातील तिघांचा जीव !

 



नांदेड : बिडीच्या व्यसनाने मोठा घात केला असून एकाच कुटुंबातील तिघांचा जीव एका बिडीने घेतल्याची अत्यंत धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. 


कुठलेही व्यसन हे घातक असतेच पण नांदेड येथे घडलेली घटना काहीशी वेगळी आहे. व्यसन करणारे लोक परिणामाचा विचार करताना दिसत नाहीत. गुटखा, तंबाखू खाणारे कुठेही पिचकाऱ्या मारून रंगकाम करीत असतात तर बिडी, सिगारेट ओढणारे कुठेही धूर काढत असतात. आपल्या धुराचा इतरांना काही त्रास होतो याचा विचारसुद्धा केला जात नाही. पण ही विडी, सिगारेट धोकादायक असली तरी एका क्षणात तिघांचा जीव संपवू शकते हेच नांदेड जिल्ह्यातील एका भयानक घटनेने समोर आणले आहे. विडी सिगारेट ओढून अर्धवट आणि पेटते थोटूक कुठेही फेकले जाते, त्यामुळे आग लागू शकते याचाही विचार केला जात नाही. नांदेड जिल्ह्यातील घटना मात्र यापेक्षाही भयावह ठरली आहे. 


एका बिडीने एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बल्लूर येथे घडलेल्या या दुर्घटनेने प्रत्येकजण हादरला असून अनेकांचे डोळे उघडले आहेत. संक्रप्पा कुटुंब शेतात पिकांवर फवारणी करण्याचे काम करीत होते.  ५२ वर्षे वयाचे सुर्यकांत संक्रप्पा हे तोंडात पेटती बिडी असताना फवारणी यंत्रात पेट्रोल टाकत होते. यावेळी तोंडातल्या बिडीची एक ठिगणी पेट्रोलवर पडली आणि काही कळायच्या आत पेट्रोलचा मोठा भडका उडाला. या भडक्यासोबत सुर्यकांत देखील आगीच्या ज्वाळात लपेटले गेले. एका क्षणात हे सगळे घडून गेले होते आणि काय होतंय हे कळायच्या आत सुर्यकांत यांना आगीने घेरले होते. 


सर्वांगाला आग लागल्याने सुर्यकांत संक्रप्पा हे मोठ्याने ओरडू लागले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येताच त्यांची पत्नी गंगुबाई संक्रप्पा धावून आल्या. आगीने घेरलेल्या पतीला वाचविण्याचा प्रयत्न त्या करू लागल्या पण त्यांना देखील आगीने विळखा घातला.  दोघेही जीवाच्या आकांताने ओरडत असल्याने त्यांचा वीस वर्षांचा मुलगा कपील हा धावत आला आणि दोघांना लागलेली आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागला पण तो देखील या आगीत भाजला गेला. लवकर आग विझवता आली नसल्याने तिघेही गंभीररित्या भाजले गेले. त्यांना तातडीने देगलूर येथील प्राथमिक रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार करून नांदेड येथे पाठविण्यात आले.  तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली होती. उपचार सुरु असताना दुर्दैवाने तिघांचाही मृत्यू झाला. एका बिडीने संपूर्ण शेतकरी कुटुंब संपवून टाकले. 


एका बिडीने मोठा घात केला आणि पती, पत्नी आणि मुलगा यांच्या आयुष्याचा शेवट झाला. या घटनेची नांदेड जिल्हाभर चर्चा सुरु असून पेट्रोल वापरताना किती काळजी घेणे आवश्यक आहे हेच या घटनेने दाखवून दिले आहे. (Smoking addiction took the lives of three)बीडी, सिगारेटचे व्यसन असणाऱ्यांसाठी हा एक मोठा इशाराच ठरला आहे.    


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !