शोध न्यूज : अपंग निधीसाठी उपोषणास बसलेल्या गतिमंद मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकानी केली असून प्रशासनाने मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत.
ग्रामपंचायतीच्या निधीपैकी पाच टक्के निधी हा ग्रामपंचायतीने अपंगासाठी खर्ची घालावा अशी तरतूद असून बार्शी तालुक्यातील चिखर्डे ग्रामपंचायतीने अनेक वर्षांपासून असा निधी खर्ची घातलेला नाही त्यामुळे आंदोलन हाती घेण्यात आले होते. १८ ऑगष्ट पासून या गावातच गावकऱ्यानी उपोषण सुरु केले होते. या उपोषणास गावातील दहा ते पंधरा लोक बसले होते यात १२ वर्षे वयाची गतिमंद मुलगी वैष्णवी रामचंद्र कुरळे ही देखील सहभागी झाली होती. या मुलीचा उपोषणादरम्यान मृत्यू झाला असून दिवसभर ऊन लागल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे नातेवाईक आणि गावकरी सांगू लागले आहेत.
याच मागणीसाठी तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या दालनात अपंग मुलांना बसवून चिकर्डे ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. यावेळी संबंधित दोषींच्या विरोधात कारवाई करतो असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले होते परंतु कसलीही कारवाई झाली नाही त्यामुळे पुन्हा उपोषणासाठी बसल्याची माहिती गावकरी देत आहेत. या उपोषणादरम्यान वैष्णवीचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकरी आणि नातेवाईक करू लागले आहेत त्यामुळे खळबळ उडाली आहे (Allegation of Villagers, girl died due to hunger strike) तथापि प्रशासनाने हा आरोप नाकारला आहे. सदर मुलगी उपोषणास बसलेलीच नव्हती असा दावा सोलापूर प्रशासनाने केला असून पोलिसात देखील कसलीही नोंद झालेली नाही शिवाय नातेवाईक अथवा अन्य कुणीही मुलीच्या मृत्यूबाबत पोलिसात तक्रारही केलेली नाही.
उपोषणादरम्यान हा मृत्यू झाल्याचा आरोप झाल्याने एक वेगळेच वादळ उठले परंतु प्रशासनाने हा आरोप फेटाळला आहे तथापि अपंग निधीचा प्रश्न आत्ता तरी मार्गी लागणार काय? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. मृत दिव्यांग मुलगी ही उपोषणात सहभागी नव्हती, ती आजारी होती आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. रुग्णालयातून उपचार झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले होते आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !