लातूर : शाळेत गेलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या शिपायाकडूनच अत्याचार करण्याची धक्कादायक घटना पुन्हा एकदा घडली असून आता शाळेत जाणाऱ्या मुली शाळेतच सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.
महिला आणि मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस कठीण बनत चाललेला असताना शाळकरी आणि अल्पवयीन मुलीची सुरक्षा देखील धोक्यात आली असून पालकात चिंता निर्माण करणाऱ्या घटना लातूर जिल्ह्यात समोर आल्या आहेत. अशा घटनांनी पालक पुरते हादरून गेले असून मुलीना शाळेत पाठवायचे तरी कसे असा यक्षप्रश्न पालकांना पडला आहे. शाळकरी मुलीवर अत्याचार होण्याच्या दोन घटना अवघ्या चार दिवसात घडल्या आहेत त्यामुळे पालकांचे धाबे दणाणले आहेत. अल्पवयीन मुलीनाही शाळेत जाण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. रस्त्यावर मुलींना असुरक्षित वाटतच असते पण आता शिक्षण देणारी शाळा देखील त्यांना धोक्याचे मोठे केंद्र वाटू लागले आहे. अनेकदा शिक्षक म्हणवून घेणारे नराधम असा गैरप्रकार करीत असल्याच्या घटना घडत असताना आता शाळेतील शिपायाने देखील अमानुष कृत्य केले आहे.
शाळेतील शिपायाने चार दिवसाच्या अंतरावर दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. शहरात एमआयडीसी पोलीस ठाणे आणि शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्या हद्दीत या वेगवेगळ्या घटना घडल्याने लातूर शहर हादरून गेले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंबाजोगाई रस्त्यावरील एका शाळेत शिपायाने हा गैरप्रकार केल्याची बाब समोर आली आहे. शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीला या शिपायाने शाळेतच गाठले आणि तिला तिच्या शिक्षकाने बोलावले असल्याचे सांगितले. सदर मुलीला त्याने शाळेच्या ग्रंथालायाजवळ नेले आणि तिला 'तुला वर्गात मॉनेटर बनवतो असे सांगत तिच्याशी चाळे करीत अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच या शिपायास अटक करण्यात आली आहे.
या घटनेची शहरात चर्चा सुरु असताना आणि या घटनेला चार दिवस होतात तोच पुन्हा एकदा अशी घटना घडली आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका शाळेत दोन कोवळ्या बालिकांवर अत्याचार करण्यात आला आहे. शाळेत खेळत असलेल्या अवघ्या सहा वर्षे वयाच्या दोन मुलींना चॉकलेट आणि मोबाईल देण्याचे अमिश दाखवत ही दुसरी धक्कादायक घटना घडली. आमिष दाखवत या दोन मुलींना शाळेच्या वॉचमनने त्यांना वॉशरूमकडे नेले आणि या मुलींशी अश्लील कृत्ये केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने चिमुकल्या मुली घाबरून गेल्या.
शाळेतून घरी आल्यानंतर शाळेत घडलेला हा प्रकार या मुलींनी आपल्या घरी सांगितलं तेंव्हा पालक देखील हादरून गेले. सदर मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शाळेच्या कर्मचाऱ्यास अटक केली आहे परंतु लागोपाठ घडलेल्या दोन घटनांमुळे पालक हादरले असून शाळेतील मुलींचीही सुरक्षा धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. चार दिवसात दोन घटना घडल्या आणि तीन मुलींना शाळेच्या कर्मचाऱ्यानेच वासनेचे शिकार बनवले असल्याने मुलींना शाळेत कसे पाठवायचे हाच मोठा प्रश्न पालकापुढे निर्माण झाला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !