BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ जून, २०२२

"विठ्ठल" च्या रणांगणात 'स्वाभिमानी" आक्रमक !



पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रणांगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनाही उतरली असून आत्तापर्यंत ८१ उमेदवारी अर्ज दाखल झालेले असून यात स्वभिमानीच्या सात उमेदवारांच्या अर्जाचा समावेश आहे.


शेतकऱ्यांचा राजवाडा अशी ओळख असलेल्या आणि पंढरपूर तालुक्यातील राजकारणाचे मुख्य केंद्र असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आणि अनेकजण कारखान्याचे संचालक होण्यासाठी लंगोट लावून तयार होऊ लागले आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीत असून कारखान्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे होते पण तसे आजिबात घडले नाही. उलट शेतकऱ्यांचा राजवाडा अडचणीत असताना त्याचे राजकीय भांडवल करण्यात अनेकांना रस वाटत गेला आणि आता त्याचेच भांडवल करीत काही जण संचालकपदाची स्वप्ने पाहू लागली आहेत. कारखाना अडचणीत आल्यामुळे शेतकरी देखील संकटात आला पण राजकारणापुढे हा विषय बाजूला पडत गेला. दिवंगत आमदार भारत भालके कारखान्याचे चेअरमन असताना त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे आता मैदानात उतरत आहेत याबाबत सोशल मीडियावर मात्र अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.


तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत आवाज उठवणारी आणि आंदोलने देखील करणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आता या निवडणुकीच्या रणांगणात उतरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तालुक्यात तेवढी शक्ती नसली तरी निवडणुकीत रंगत मात्र निश्चित येणार आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना काय भूमिका घेतेय याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते. 'स्वाभिमानी' देखील काही दिवस अंदाज घेताना दिसत होती परंतु काल मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सात उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. असे असले तरी कोणत्या गटासोबत जायचे याबाबत अद्याप या संघटनेचा विचार झालेला दिसत नाही. 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सात अर्ज दाखल केले असून यात विष्णू सदाशिव बागल, अरुण शंकर शिंदे पाटील, पंजाब कल्याण भोसले, तानाजी विष्णू बागल, साहेबराव श्रीरंग नागणे, रायाप्पा धोंडीबा हळणवर, सुभाष पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज काल दाखल केले आहेत. (Vitthal Karkhana Election Swabhimani Aggressive) आजवर दाखल झालेल्या ८१ उमेदवारी अर्जात स्वभिमानीचे सात अर्ज काल दाखल झालेले आहेत.


प्रमुख गटांकडून प्रस्ताव !
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत लढणाऱ्या सर्वच प्रमुख गटांकडून आघाडीबाबत प्रस्ताव आहेत अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी दिली. सर्व गटांशी चर्चा करण्यात येणार असून शेतकरी हिताच्या तत्वाशी बांधिलकीची भूमिका असलेल्या गटासोबत जाण्याचा शेतकरी संघटना नक्की विचार करणार असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले. 


विक्रमी अर्जांची विक्री !
निवडणुकीची प्रक्रिया सुरु होताच उमेदवारी अर्जांची विक्री जोरात सुरु झाली असून कालपर्यंत एकूण ५३५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे तर ८० उमेदवारांचे  ८१ अर्ज दाखल झाले आहेत. ही गती वाढतच राहण्याची शक्यता आहे. उद्या ९ जून पर्यंत अर्ज दाखल होण्याची मुदत असल्यामुळे आज आणि उद्या आणखी बरेच उमेदवारी अर्ज दाखल होतील अशी अपेक्षा आहे.


८१ अर्ज दाखल !
काल ७ जून अखेरपर्यंत  ८० उमेदवारांनी ८१ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तुंगत गटातून १४ तर सरकोली गटातून १३ अर्ज दाखल आहेत. भाळवणी गट - १०, मेंढापूर गट - ५, कासेगाव गट - ७, सहकारी संस्था गट - १,  महिला गट - १, ओबीसी गट - १०, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग गट - ९ अशा दाखल अर्जांचा समावेश आहे.  




            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !