BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ जून, २०२२

झोपलेल्या शेतकऱ्याचा गरम तेल टाकून खून !

 



माढा : झोपलेल्या शेतकऱ्याचा अंगावर गरम तेल टाकून खून केल्याची धक्कादायक घटना माढां तालुक्यातील सापटणे (टें) येथे घडली असून भावकीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. 


खून करण्याचे अनेक गुन्हे नेहमी घडत असतात आणि यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरण्याचा प्रयत्न गुन्हेगार करीत असतात. हातात शस्त्र घेवून हल्ला करून जिवंत माणसांची हत्या केली जाते तर कधी अपघाताचा बनाव करून खून केला जातो. कधी कधी तर चोरट्यांनी मारले असे भासविले जाते पण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सापटणे येथे मात्र वेगळीच पद्धत वापरण्यात आली आहे. झोपेत असतानाच एका शेतकऱ्याच्या अंगावर तापलेले तेल टाकून खून करण्याची ही घटना समोर आली आहे. भावकीच्या वादातून हा खून झाल्याचे प्रकरण आहे. गरम तेल ओतल्याने जखमी झालेल्या शेतकऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यानंतर याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. 


शहाजी गोविंद ढवळे हे ५५ वर्षे वयाचे शेतकरी आपली पत्नी अनिता यांच्यासह शेतातील घरी रहात होते. मध्यरात्रीनंतर अनिता या शेतात पिकला पाणी देण्यासाठी गेल्या परंतु जाताना त्यांनी दरवाजा उघडाच ठेवला होता. शहाजी ढवळे हे झोपलेले असल्यामुळे त्यांना उठवले नाही त्यामुळे दरवाजा तसाच उघडा ठेवला गेला. त्यानंतर काही वेळाने झोपलेले शहाजी ढवळे एकदम ओरडू लागले. त्यांच्या अंगावर कुणीतरी गरम तेल ओतले आणि त्यामुळे ते भाजले गेले. झोपेतून ओरडतच ते उठले असता त्यांना भावकीतील संतोष राजेंद्र ढवळे आणि नरसिंग राजेंद्र ढवळे हे दोघे भाऊ त्यांच्या घरातून जाताना त्यांनी पहिले. झोपेत बेसावध असताना त्यांच्या अंगावर तापलेले तेल ओतले गेल्याने शहाजी ढवळे हे शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजले गेले होते.


भाजून गंभीर जखमी झालेल्या शहाजी यांना टेंभुर्णी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले होते परंतु त्यांचा मृत्यू झाला. (Murder of a farmer by pouring hot oil) जमिनीचा असलेला वाद आणि न्यायालयात सुरु असलेल्या जुन्या खटल्याच्या रागातून हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. 


खुनाचा गुन्हा दाखल !
अंगावर तापलेले तेल ओतल्याने शहाजी यांचे शरीर पूर्ण भाजले गेले होते. संतोष ढवळे आणि नरसिंग ढवळे यांचा शहाजी यांच्यासोबत जुना वाद होता. याबाबत एक खटला न्यायालयात सुरु असून जमीन आणि रस्त्याचा देखील त्यांच्यात वाद होता. या वादातून ही घटना घडली असून पोलिसांनी संतोष आणि नरसिंग यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !