BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ जून, २०२२

भीषण अपघातात दोन भाऊ ठार, आई, मुलगा गंभीर जखमी !


पंढरपूर : पंढरपूर येथून देवदर्शन करून जाताना पंढरपूर- मिरज मार्गावर झालेल्या थरारक अपघातात दोघे जण ठार झाले तर दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

 

नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग अजून पूर्णपणे पूर्णत्वास आलेला नसला तरी सांगोला ते मिरज दरम्यान या मार्गावरून अत्यंत वेगवान वाहतूक सुरु आहे. संगोल्यापासून पुढे हा रस्ता तयार झालेला असला तरी अनेक ठिकाणी मध्येच काही व्यत्यय असतात. किरकोळ स्वरुपाची कामे अनेक ठिकाणी शिल्लक आहेत आणि यामुळेच मोठे अपघात होत आहेत. मध्येच अचानक रस्ता वळण किंवा दुरुस्ती असे प्रकार आढळून येतात.

 

रस्ता रुंद आणि सिमेंटचा बनला असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अत्यंत वेगात असते आणि अचानक रस्त्यात काही अडथळा समोर आला तर चालकाला वाहनावर नियंत्रण राखता येत नाही त्यामुळे हा रस्ता झाल्यापासून आजवर अनेक अपघात झाले आहेत आणि यातील बहुतेक अपघातात जागेवरच मृत्यू आलेले आहेत. विशेषत: कवठे महांकाळ हद्दीत या अपघाताचे प्रमाण अधिक असून पुन्हा याच हद्दीत नागज फाट्याच्या जवळ अत्यंत भीषण अपघात झाला आहे.


माण तालुक्यातील कळसकर वाडी येथील आनंदराव शिवराम पवार यांचा मुलगा स्वप्नील याने नवी कोरी चार चाकी गाडी खरेदी केली होती. या गाडीची पूजा करून ६८ वर्षे वयाचे आनंदराव पवार हे आपला मुलगा स्वप्नील, पत्नी उषा पवार आणि चुलतभाऊ माणिक साहेबराव पवार हे देवदर्शनासाठी बाहेर पडले. तुळजापूर येथे जाऊन त्यांनी भवानीमातेचे दर्शन घेतले आणि पंढरपूर येथे आले. 


पंढरपूर येथे त्यांनी विठूमाऊलीचे दर्शन घेतले आणि  पंढरपूर येथून ते कोल्हापूरला ज्योतिबाच्या दर्शनासाठी निघाले होते.  नवी कोरी गाडी घेऊन ते पंढरपूरकडून मिरजच्या दिशेने जात असताना नागज फाट्यापासून काही अंतरावर गणेश पेट्रोल पंपाच्या जावळ त्यांची गाडी पोहोचली. स्वप्नील पवार हे गाडी चालवत असताना अचानक त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली.  


उभ्या ट्रकवर मागच्या बाजूने भरधाव कार आदळल्याने आनंदराव शिवराम पवार (वय ६८) हे जागीच ठार झाले, कारमध्ये ते डाव्या बाजूला बसले होते आणि त्याच बाजूचा अधिक भाग ट्रकला धडकला. त्यांचे चुलतभाऊ माणिक साहेबराव पवार (वय ५८)  हे मागच्या बाजूला बसले होते. ते देखील या अपघातात गंभीर जखमी झाले परंतु उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेले जात असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. एकाच अपघातात दोघे बंधू मृत्युमुखी पडले. (Accident, Pandharpur Miraj road two brothers death)आनंदराव पवार यांच्या पत्नी उषा पवार आणि स्वप्नील पवार हे देखील या अपघातात गंभीररित्या जखमी झाले आहेत.


राजकीय वलय 

अपघातात ठार झालेले आनंदराव पवार यांचे माणच्या पश्चिम भागात मोठे राजकीय वलय होते. आमदार जयकुमार गोरे यांचे ते खंदे समर्थक होते, कुळकजाई विकास सोसायटीचे ते माजी अध्यक्ष होते तर १९९२ साली पवार यांनी तर १९९७ साली त्यांच्या पत्नी उषा पवार यांनी पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक लढवली होती. 


नव्या गाडीचे बळी 

नवी चार चाकी गाडी घेतल्याने पवार कुटुंबीय आनंदात होते आणि तीच गाडी घेऊन हे कुटुंब  देवदर्शनासाठी बाहेर पडले होते पण या गाडीचा आनंद फार काळ टिकला नाहीच पण दोघांचे प्राण गेले. पवार यांचा मुलगा स्वप्नील हा ही गाडी चालवत होता. स्वप्नील हा फर्ग्युसन ट्रॅक्टर कंपनीत नोकरी करीत असून येत्या काही दिवसात त्याचा साखरपुडा होणार होता पण पवार कुटुंबावर मोठे संकट आले आहे. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !