BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जून, २०२२

राज्यातील शाळाबाबत आयुक्तांचे नवे निर्देश !



 मुंबई : उन्हाळा संपल्यानंतर राज्यातील शैक्षणिक वर्ष येत्या १३ जूनपासून सुरु होणार असले तरी विद्यार्थ्यांना मात्र १५ जूनपासूनच शाळेत जावे लागणार आहे. याबाबत शालेय शिक्षण आयुक्त यांनी निर्देश दिले आहेत.


कोरोनामुळे दोन वर्ष शाळांचे दरवाजे बंद राहिले आणि पुन्हा शाळा सुरु होताच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपासून दूरच राहावे लागले आहे. एरवी शाळेत जाण्याचा कंटाळा करणारे विद्यार्थीही आता शाळा कधी सुरु होईल याची वाट पहात आहेत. राज्यातील शाळा आता लवकरच सुरु होणार असून विद्यार्थी देखील सज्ज झाले आहेत परंतु शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांचे निर्देश शिक्षण संचालक, उप संचालक, शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी शाळा १५ जून रोजीच सुरु होणार आहे.  राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या १३ जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. तर, १५ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. 


जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होऊन चौथा सोमवारी २७ जून रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १३ ते १४ जून रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीच्या अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. तसेच विदर्भातील शाळांबाबत दि. २४ ते २५ जून रोजी या बाबींचे आयोजन करण्यात येऊन दि. २७ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यात, असे या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.


शासन, आरोग्य विभाग, स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी देण्यात आलेले तसेच यापुढे देण्यात येणारे निर्देश , सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याचे तसेच शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे आणि पालकांचे कोविड-19 प्रार्दुभावाच्या अनुषंगाने प्रबोधन, उद्बोधन करण्यात यावे, असे निर्देशही श्री.मांढरे यांनी दिले आहेत. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पुरेशी काळजी देखील घेतली जाणार आहे.


राज्यातील कोरोना पुन्हा वाढत असून दररोजची वाढ ही मोठी आहे. कोरोनाची चौथी लाट आल्याचे अधिकृतपणे अद्याप सांगण्यात आलेले नसले तरी ही वाटचाल चौथ्या लाटेकडे निघाली असल्याची दिसत आहे. मुंबई विभागात तर उद्रेकाची परिस्थिती निर्माण झाली असून रोजचे नवे कोरोनाबाधित वेगाने वाढताना दिसत आहेत. सद्या तरी शाळा सुरु करण्यावर शासन ठाम असून शाळा सुरु होतीलही पण कोरोना असाच वाढत गेला तर मात्र पुन्हा एकदा शाळा संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (New instructions regarding schools in Maharashtra) राज्यातील सद्यस्थिती ही चिंताजनक बनत चालली आहे त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत गेली तर शाळांचे दरवाजे पुन्हा बंद होऊ शकतात. 


राज्यात रुग्णांची वाढ 

मागील २४ तासात राज्यात २ हजार ८१३ रुग्णांची वाढ झाली आहे त्यामुळे चिंता वाढू लागली आहे. राज्यातील रुग्णसंख्या ७९ लाख १ हजार ६२८ वर पोहोचली असून मृत्यू झाल्याचा आकडा १ लाख ४७ हजार ८६७ झाला आहे. दरम्यान मागील २४ तासात १ हजार ४७ रुग्ण बरे झाले असून त्याना घरी सोडण्यात आले आहे. आता ११ हजार ५७१ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईत आज एका दिवसात १ हजार ७०२ नवे रुग्ण आढळून आले असून होत असलेली वाढ ही मुंबईतील अधिक आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !