BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जून, २०२२

पंढरपूर तालुक्यात पुन्हा बालविवाह, वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल !

 



पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील एका वस्तीवर गुपचूप लावलेल्या बालविवाहाची चर्चा सुरु असतानाच पुन्हा एकदा तालुक्यातील आंबे चिंचोली येथे लावण्यात आलेल्या बाल विवाहप्रकरणी ५० ते ६० वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कायद्यानुसार बालविवाह करण्यास मनाई आहे आणि याची माहिती असताना देखील अत्यंत गुपचूप पद्धतीने बालविवाह होताना दिसतात. प्रशासनाला याचा सुगावा लागताच संबंधित पथक विवाहाच्या ठिकाणी धडकते आणि बालविवाह होण्यापासून रोखले जाते. असे विवाह होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक असून विवाहाबाबत गावात अनेकांना आधीच माहित असते परंतु याबाबत कुणी तक्रारी करीत नाहीत किंवा प्रशासनाला कळवत नाहीत. त्यातूनही प्रशासनाला खबर लागते आणि अनेक बालविवाह रोखल्याची घटना घडलेल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील देखील काही बाल विवाह प्रशासनाने वेळीच रोखले आहेत परंतु पंढरपूर तालुक्यातील आणखी एक बाल विवाह झाला आणि त्यानंतर पोलिसांनी विवाहाला उपस्थित असलेल्या ५० ते ६०  जणांच्या  विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


पंढरपूर तालुक्यातील आंबे चिंचोली येथे गुरुवारी एक बालविवाहाची घटना घडली. येथील गैबी पीर दर्ग्यासमोर भर दुपारी काही लोकांच्या उपस्थितीत एक बाल विवाह उरकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्राम विकास अधिकारी अनिल पाटील यांच्यासह पथकाने या गावास भेट दिली आणि बालविवाहाबाबत चौकशी केली. विवाह करण्यात आलेल्या मुलीच्या वडिलांकडे मुलीच्या वयाबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अखेर पोलिसांनी सदर मुलीच्या वयाचा दाखला मिळवला आणि वयाबाबत खात्री करून घेतली. प्राप्त दाखल्यानुसार सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आले.


मिळालेल्या दाखल्यानुसार विवाह झालेल्या मुलेचे वय हे १७ वर्षे १ महिना ११ दिवस असल्याचे स्पष्ट झाले आणि अल्पवयीन मुलीचा विवाह केला गेला असल्याचे दिसून आले. ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी याबाबत पोलीस ठाण्यात बालविवाहाबाबत फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी बालविवाह प्रतीबंधाकात्मक अधिनियमाच्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Child marriage again in Pandharpur taluka) अल्पवयीन वधू आणि वराचे नातेवाईक, विवाह लावणारे काझी, विवाहास उपस्थित असलेली वऱ्हाडी मंडळी अशा ५० ते ६० व्यक्तींच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


खर्डीतही बालविवाह !

पंढरपूर तालुक्यातील खर्डी परिसरात एच पी पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या चव्हाण मळ्यात भर दुपारी एक बालविवाह करण्यात आला. पोलिसांना या विवाहाची माहिती मिळाली तेंव्हा पोलीस तातडीने खर्डीकडे धावले पण तोपर्यंत हा विवाह झालेला होता. बालविवाह झाल्याची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी भगवान कुलकर्णी तसेच पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेवून विवाहाबाबत खात्री करून घेतली. बालिका वधूच्या पित्याकडे या पथकाने मुलीच्या वयाची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अखेर खात्रीसाठी मुलीच्या जन्मतारखेचा दाखला प्राप्त करून घेण्यात आला. (Child marriage, case file against two hundred people) सदर दाखल्यानुसार विवाह झालेल्या मुलीचे वय १४ वर्षे ८ महिने असल्याचे समोर आले. 


वऱ्हाडी मंडळी गोत्यात !

बालविवाह कायद्याने गुन्हा असल्याचे माहित असताना देखील ग्रामीण भागात छुपेपणाने असे विवाह उरकले जातात. विवाहाबाबत गावात माहित असले तरी प्रशासनापर्यत ही माहिती दिली जात नाही. एवढेच नव्हे, तर गावातील प्रतिष्ठित मंडळी देखील अशा विवाहास उपस्थित राहतात परंतु नंतर ही माहिती प्रशासनापर्यंत पोहोचते आणि वऱ्हाडी मंडळी सुध्दा गोत्यात येतात. गावातील बालविवाहाबाबत विवाहापूर्वीच माहिती दिली जावी ही प्रशासनाची अपेक्षा असते शिवाय असे विवाह न करण्याबाबत आवाहन देखील करण्यात येत असते.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !