BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जून, २०२२

मोसमी पावसाबाबत हवामान खात्याचा नवा अंदाज !

 



वेळेआधी येईल असे सांगितलेला मान्सून वेळ झाली तरी आला नाही पण आता मात्र हवामान विभागाने पुन्हा एक नवा अंदाज व्यक्त केला असून पुढील ४८ तासात मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


'येणार येणार ... यावर्षी पाऊस वेळेच्या आधीच दाखल होणार' असा अंदाज हवामान विभागाने मे महिन्यापासूनच सुरु केला होता पण ९ जून उजाडला तरी, अर्थात नियमित वेळ उलटली तरी मान्सून काही राज्यात दाखल झाला नाही. अंदमानात हा मान्सून अगदी वेळेच्या आधी आला आणि थोडासा रखडत पुन्हा तो वेळेपूर्वी केरळमध्येही येऊन धडकला. केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर आता तो राज्यात देखील वेळेच्या आधी येईल असे चित्र निर्माण झाले पण हा मान्सून कारवार, गोव्याच्या सिमेपलिकडेच रखडला आणि महाराष्ट्रातील शेतकरी केवळ आभाळाकडे पहात राहिला. महाराष्ट्रात साधारण मान्सून दाखल होण्याची तारीख ७ जून असते पण ९ जूनचा दिवस उजाडला तरी अजूनही तो 'येणार येणार' असेच म्हणण्याची वेळ कायम आहे. 


हवामान विभागाला यावेळी अनेकदा तोंडावर पडावे लागले आहे परंतु शेवटी त्यांचाही अंदाज असतो. शेतकरी मात्र या अंदाजावर शेतीची कामे उरकत असतात आणि नंतर मात्र आभाळाकडे डोळे लावून बसावे लागते. कोकणात मात्र कालपासून चांगला पाऊस सुरु झाला असून हवामान विभागाचा हा अंदाज मात्र अचूक ठरला असल्याचे दिसत आहे. यंदा वेळेपूर्वी आणि दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने शेतकरी मंडळीनी शेतीची कामे वेगाने उरकली आहेत. (Meteorological Department's new rain forecas) आता केवळ पाऊसधारा कोसळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे. 


गेल्या काही दिवसात अनेक अंदाज व्यक्त झाल्यानंर आता हवामान विभागाने नवा अंदाज व्यक्त केला असून त्यानुसार आगामी ४८ तासात राज्यात तसेच देशातील काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य अरबी समुद्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग तसेच दक्षिण आंध्रातील काही भागात मोसमी पावसासाठी अनुकुलता निर्माण झाली आहे त्यामुळे आगामी दोन दिवसात राज्यात मोसमी पावसाच्या सरी बरसतील असा दिलासादायक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 


या आधी देखील हवामान विभागाने १२ ते १३ जूनच्या दरम्यान पावसाचे आगमन होईल असे भाकीत केलेले होते. आता मोसमी पावसाच्या पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल झाले असल्याने त्याचा पुढचा प्रवास सुरु होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान काही दिवसांपासून गोव्याच्या वेशीवरच मान्सून थांबलेला होता पण कोकणात कालपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले आणि संध्याकाळच्या वेळेस पावसाला सुरुवात देखील झाली. पावसासाठी एकंदर अनुकुलता निर्माण झालेली असून ४८ तासात मोसमी पावसाचे आगमन होण्याची शक्यता आता गडद झाली आहे. 

   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !