BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जून, २०२२

बाप आणि लेक एकाचवेळी झाले बारावी पास !


 

करमाळा :  दहावी बारावीचे निकाल लागले की दरवर्षी काहीतरी आगळीवेगळी बातमी समोर येत असते, यावेळी सोलापूर जिल्ह्यातील ही वेगळी घटना असून वडील आणि मुलगी हे दोघेही एकाच वेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि याची चर्चा देखील सुरु झाली आहे.



शिक्षणाला वय नसते हे अनेकदा दिसून आले आहे. साठी ओलांडलेल्या व्यक्तींनीही पदवी परीक्षा दिल्या आहेत. कुठल्या न कुठल्या कारणांनी वृद्धावस्थेकडे झुकत चाललेल्या महिलांनी देखील दहावीची परीक्षा दिली आहे आणि या परीक्षेत त्या उत्तीर्ण देखील झालेल्या आहेत. अनेकदा काही कारणामुळे शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते पण शिकण्याची जिद्द असली की वाढत्या वयात देखील परीक्षा देवून उत्तीर्ण होतात. केवळ नोकरी मिळविण्यासाठीच शिक्षण नसून ते कुठल्याही वयात घेतले जाऊ शकते आणि परीक्षा देवून पास देखील होता येते हे दाखविणारी अनेक उदाहरणे समाजात असताना करमाळा तालुक्यातील कविटगाव येथील एका वडिलाने आणि त्यांच्या मुलीने एकाचवेळी बारावीची परीक्षा दिली आहे या परीक्षेत दोघेही उत्तीर्ण झाले आहेत. 


बारावीच्या परीक्षेचा निकाल लागताच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत होते, कुणी परस्परांना पेढे भरवित होते तर कविटगाव येथील कु. साक्षी सरडे आणि तिचे वडील शिवाजी सरडे हे मात्र परस्परांचे कौतुक करताना दिसत होते.  शिवाजी सरडे यांनी वयाची चाळीसी ओलांडली आहे पण शिक्षणाचे महत्व त्यांच्यासाठी कमी झाले नाही. त्यांची मुलगी साक्षी यावर्षी बारावीत शिकत होती आणि साक्षी ही अभ्यासात देखील हुशार होती. साक्षी बारावीची परीक्षा देणार असल्याने तिचे वडील शिवाजी सरडे यानाही बारावीची परीक्षा देण्याची इच्छा झाली आणि त्यांनी १७ नंबर फोरम भरून बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. (Father and daughter passed Twelfth exam same time )


या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला आणि हे दोघेही या परीक्षेत पास झाले आहेत. मुलगी साक्षी ही अभ्यासात हुशार असल्याने तिच्या पास होण्याची वडिलांना खात्री होतीच पण आपल्या निकालाबाबत त्यांना उत्सुकता होती. शिवाजी सरडे यांनी आधी मुलीचा निकाल पाहण्याऐवजी वेबसाईटवर आपला निकाल आधी पहिला. ते उत्तीर्ण झाले असल्याचे त्यांना पाहायला मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचाही निकाल पहिला. वडील आणि मुलगी दोघेही बारावी परीक्षेत पास झाले होते त्यामुळे आनंदीआनंद झाला. दोघांनीही परस्परांचे अभिनंदन आणि तोंड भरून कौतुक देखील केले. त्यांच्या या यशाची परिसरात चर्चा होऊ लागली असून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 


कौतुकच कौतुक ! 

शिवाजी सरडे यांच्या पत्नी कविटगावच्या सरपंच असून त्यांनी चाळीशी ओलांडल्यानंतर बारावीची परीक्षा दिली आणि तब्बल ७० टक्के गुण मिळवून ते पास देखील झाले याचे परिसरात जोरदार कौतुक होऊ लागले आहे. त्यांची मुलगी साक्षी हिने देखील ८५.५० टक्के गुण मिळवले आहेत. साक्षी ही उत्तम खेळाडू असून तिने राष्ट्रीय पातळीपर्यंत योग विषयात तर मल्लखांबची राज्यपातळीवर बक्षिसे मिळवली आहेत. वडील आणि मुलीचे यश हा देखील कौतुकाचा विषय बनला आहे     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !