BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जून, २०२२

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद उमेदवार जाहीर !

 



मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार घोषित करण्यात आले असून जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. 


महाराष्ट्र विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होत असून आजपासून (९ जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. विधानसभेत असलेल्या पक्षीय बळानुसार या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे चार तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे प्रत्येकी दोन उमेदवार आणि काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. दहाव्या जागेसाठी मात्र भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार रस्सीखेच होऊ शकते. राज्यसभा निवडणुकीवरून अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत असतानाच विधान परिषद निवडणुकीत देखील रंगत निर्माण होताना दिसत आहे. या निवडणुकीत कुणाकुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आता संपलेली असून सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित केले आहेत. 


भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार घोषित केले तरी राष्ट्रवादीचे उमेदवार घोषित करण्यात आले नव्हते. भाजपातून राष्ट्रवादीत आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांच्या नावासंदर्भात अंतिम विचार होत नव्हता परंतु आता राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि एकनाथ  खडसे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब  केले आहे. (Maharashtra legislative Council Election Candidate) राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी पाठवलेल्या यादी खडसे यांचे नाव होते परंतु राज्यपालांनी अजूनही या यादीला मान्यता दिली नसल्याने खडसे आमदार होऊ शकले नाहीत. आता मात्र त्यांना पुन्हा  आमदार होण्याची संधी मिळाली आहे. 


भाजप उमेदवार 

भारतीय जनता पक्षाने  विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या दोघांना पुन्हा संधी दिली असून श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत तसेच विनायक मेटे आदींना मात्र या उमेदवारीत स्थान मिळाले नाही. पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. 


सदाभाऊ खोत मुंबईकडे 

सदाभाऊ खोत हे मुंबाकडे रवाना झाले असून भारतीय जनता पक्षाने त्यांना तातडीने बोलावले आहे. भाजप सहावा उमेदवार देणार असून यासाठी सदाभाऊ खोत यांचे नाव निश्चित केले जाण्याची शक्यता दिसत आहे. सहावा उमेदवार दिल्यास या निवडणुकीत आणखी चुरस निर्माण होणार आहे.


काँग्रेसचे उमेदवार 

काँग्रेस पक्षाकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नावाला पसंती मिळाली आहे. मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन संकपाळ, संजय दत्त, अतुल लोंढे, सचिन सावंत या नावांची काँग्रेस पक्षात चर्चा होती परंतु वरिष्ठ पातळीवरून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांची वर्णी लागली आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !