BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ मे, २०२२

खुनाचा आरोप, चौदा वर्षे मनस्ताप, आता भरपाईची मागणी !




सोलापूर : खून केल्याच्या आरोपातून न्यायालयाने चौघांची निर्दोष मुक्तता केली पण या आरोपामुळे चौदा वर्षे मनस्ताप सहन करावा लागला त्यामुळे नुकसान भरपाईचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती जेष्ठ विधिज्ञ ऍड. धनंजय माने (आबासाहेब)  यांनी दिली. 


न्यायालयामुळे खरे गुन्हेगार शिक्षा भोगायला जातात आणि निरपराध व्यक्तींची निर्दोष मुक्तता होत असते. विविध कारणांमुळे न्यायालयात निकाल प्रलंबित राहतो आणि न्याय मिळण्यात देखील विलंब होतो त्यामुळे न्याय मिळण्यास विलंब होणे हा देखील एक प्रकारे अन्याय असतो असे मानले जाते. अनेकदा पोलिसांच्या चुकीच्या निर्णयाने अथवा अन्य कारणाने निरपराध व्यक्ती देखील एखाद्या गुन्ह्यात अडकते आणि अशा व्यक्तीचे अपरिमित नुकसान होते. न्यायालयात निरपराध व्यक्ती निर्दोष होत असली तरी न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्याला सामाजिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. जामीन न मिळाल्यास आयुष्यातील अनेक वर्षे त्याला तुरुंगात खितपत पडावे लागते आणि जामीन मिळाला तरी निकाल लागेपर्यंत त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळलेली असते. अशा व्यक्तीला न्यायालयाने आरोपातून मुक्त केल्यानंतर दरम्यानच्या काळात झालेल्या प्रचंड नुकसानीची भरपाई सहसा मागितली जात नाही पण मोहोळ तालुक्यातील कुरूल येथील आरोपींच्या वतीने अशी भरपाई मागण्यात येणार आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथे दिनांक १७ ऑगष्ट २००८ रोजी आर्थिक व्यवहारातून औदुंबर कौरव नवले उर्फ आण्णा यांचा धारदार शस्त्राने मारून खून करण्यात आला होता. या खुनाच्या आरोपावरून मोहोळ तालुक्यातील कुरूल येथील आण्णा दत्तात्रय झुंझुर्डे यांच्याश चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी सोलापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर झाली आणि सदर चारही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दरम्यान तब्बल चौदा वर्षांचा काळ गेला होता आणि संशयित आरोपींना प्रदिर्ध काळ वेगवेगळ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले होते. 


आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून दि. १७ जुलै २००८ रोजी अण्णा ऊर्फ औदुंबर नवले याचा खून केल्याचा आरोप अण्णा झुंझुर्डे व इतरांवर ठेवण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपींनी हा गुन्हा केल्याचे सिद्ध होत नाही. आरोपी व मयतामध्ये कोणतेही वैमनस्य नव्हते. फरारी आरोपीचा मोबाईल मयताने चोरला होता. त्यावेळी फरारी आरोपींनी मयतास जीवे मारण्याची धमकी दिली होती. मरण्यापूर्वी मयत अण्णा हा फरारी आरोपीसोबत होता असा पुरावा आलेला आहे. घटनेशी कोणताही संबंध नसताना झुंझुर्डे कुटुंबीयांना या खटल्यात गुंतविले आहे, असा बचाव आरोपी पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आला होता.  या प्रकरणी आरोपींतर्फे प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. रियाज शेख (मोहोळ) ,ॲड. विकास मोटे यांनी काम पाहिले.        

                             

दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्याइतपत पुरावा आरोपीविरुद्ध नसताना त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यामुळे आरोपींना विनाकारण १४ वर्षे न्यायालयात हेलपाटे घालावे लागले. खटल्याची १४ वर्षे टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे आरोपींना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल  नुकसान भरपाई  मिळण्याचा दावा न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे आरोपींच्या वतीने एड. धनंजय माने यांनी सांगितले. खटल्याचा निकाल येण्यास चौदा वर्षांचा कालावधी लागला आणि या दरम्यान संशयित आरोपीना विविध त्रासाला सामोरे जावे लागले आहे त्यामुळे आता ते नुकसान भरपाई मागणारा दावा न्यायालयात दाखल करणार आहेत.  


 हे देखील वाचा : >>


             


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !