
सोलापूर : जवळ जायचं असलं तरी गाडीला किक मारल्याशिवाय हल्ली कुणाला राहवत नाही पण सोलापूरच्या एका पठ्याने चक्क सायकलवरून दिल्ली गाठली आणि थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Aravind Kejariwal) यांची भेट घेत आपल्या मनातली एक मागणीही केली.
गेल्या काही वर्षात वाहनांचे प्रस्थ एवढे वाढले आहे की एक दोन किलोमीटर अंतरावर जायचे असले तरी दुचाकीला किक मारली जाते. या प्रकारामुळे पायी चालणे विसरून गेले असून त्यामुळे शरीराला मिळणारा व्यायाम बंद झाला आहे आणि त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. अलीकडे अनेकजण शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवर्जून सायकलवरून फेरफटका मारून व्यायाम करतात. पूर्वी सायकलवरूनच प्रवास केला जायचा पण सायकलची जागा दुचाकीने घेतली आणि सायकल कोनाड्यात गेली. व्यायामासाठी मात्र आज पुन्हा सायकलची आठवण येत आहे. एरवी जवळ जायचे असेल तर दुचाकीशिवाय जायला कुणी तयार होत नाही. सोलापूरच्या एका पठ्याने मात्र सोलापूर ते दिल्ली असा प्रवास केला आहे.
सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालय शिकणाऱ्या निलेश संगेपांग या विद्यार्थ्याने हा सायकल प्रवास कुठला विक्रम करण्यासाठी केला नसून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी विनंती करण्यासाठी केला आहे. अलीकडच्या काळात स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाची क्रेझ देशभरात आहे. दिल्लीत सरकार स्थापन केलेल्या या 'आप' ने आता पंजाब देखील काबीज केले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कामाची आणि सामान्यपणाची मोहिनी अनेकवार आहे. त्याचाच प्रभाव सोलापूरच्या निलेशवर पडला आणि त्याने थेट सायकलवरून दिल्ली गाठली ( Student cycling from Solapur to Delhi) आणि आपल्या लाडक्या नेत्याची भेट देखील घेतली.
आणि सायकल सजली !
सायकलवरून दिल्लीला जाण्याचा निर्णय निलेशने घेतला आणि त्याची सायकल आपले मूळ स्वरूप पालटू लागली. निलेशने आपल्या या सायकलला तिरंगा झेंडा तर लावलाच पण आम आदमी पक्षाचा झेंडा देखील त्याने सायकलला लावला. मराठवाडा, खानदेश, मध्य प्रदेश, हरियाणा असा प्रवास करीत तो दिल्लीला पोहोचला. या प्रवासात त्याचे मोठे कौतुक देखील झाले.
मुख्यमंत्री भेट !
सोलापूर ते दिल्ली असा सोळाशे किमी अंतर सायकलवरून प्रवास केल्यानंतर निलेश दिल्लीत पोहोचला आणि आपल्या निश्चयाप्रमाणे तो मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटला. केजरीवाल यांना भेट देण्यासाठी जाताना त्याने सोलापुरी चादर, प्रसिद्ध शेंगाचटणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा नेल्या होत्या. ही भेट त्याने केजरीवाल यांना दिली.
केजरीवाल यांचा प्रभाव
निलेशवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मोठा प्रभाव आहे म्हणूनच त्याने हा प्रवास सायकलवर केला. केजरीवाल यांनी दिल्लीत नागरिकांसाठी दिलेल्या सुविधा, शिक्षण, आरोग्य याबाबत घेतलेली दक्षता यामुळे निलेश प्रभावित झाला असून आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात देखील निवडणुका लढवाव्यात अशी विनंती निलेशने केजरीवाल यांना केली आहे.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- सोलापूर जिल्ह्यातील दोन गावात एकाच दिवशी रोखले तीन बालविवाह !
- सुरक्षा कवच तोडून अज्ञात व्यक्ती शरद पवारांच्या व्यासपीठावर !
- कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत, सतर्कतेचा इशारा !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !