शोध न्यूज : चुलत्याचा खून करून त्याचे शीर घेऊन मोटार सायकलवरून नराधम गावभर फिरला असल्याची मोठी आणि तितकीच थरारक घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आली आहे. ही घटना ऐकून प्रत्येकाची बोलतीच बंद झाली आहे.
कुठल्या कुठल्या कारणावरून माणूसच माणसांच्या जीवावर उठू लागला आहे. अत्यंत निर्दयपणे दुसऱ्याचा जीव घेतला जात आहे. खून केल्यानंतर आरोपी आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न करतो तसेच पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतो. अर्थात गुन्हेगाराने कितीही हुशारी केली तरी, पोलीस आरोपीच्या मुसक्या आवळत असतातच. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मात्र मानवी मनाला जोरदार धक्का देणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. आपल्याच चुलत्याचा निर्घृण खून करून, त्याचे मुंडके घेवून हल्लेखोर पुतण्या दुचाकीवरून चक्क गावभर फिरला असल्याची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या क्रूर प्रकाराने सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. जमिनीच्या वादातून पुतण्या शिवाजी जाधव याने आपल्या चुलत्याची कुऱ्हाडीने हत्या केल्याचे हे प्रकरण माढा तालुक्यतील शेवरे येथे घडले आहे. ६५ वर्षे वयाचे शंकर प्रल्हाद जाधव यांचा कुऱ्हाडीने खून करण्यात आला आणि आरोपी शिवाजी जाधव हा पळून जाण्याऐवजी मयत शंकर जाधव यांचे मुंडके घेवून तो फिरत राहिला.
शंकर प्रल्हाद जाधव यांचा कुऱ्हाडीने खून करून आणि त्यांचे शीर कापून शिवाजी जाधव हा नराधम ते मुंडके घेवून दुचाकीवरून फिरत होता. त्यानंतर तो अकलूज पोलिसात शरण गेला आहे. या हत्येबाबत पोलिसांना माहिती मिळाली तेंव्हा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके बाहेर पडली. आता पोलिसांच्या तावडीतून सुटका होत नाही हे लक्षात येताच त्याने पोलिसांना शरण येण्याचा मार्ग पत्करला. माळशिरस तालुक्यातील माळीनगर हद्दीत त्याने आपली दुचाकी आणि चुलत्याचे मुंडके फेकून दिले आणि पोलिसांना शरण आला. त्यानंतर पोलिसांनी सदर मुंडके आणि दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हा थरारक प्रकार ऐकून देखील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. क्रूर आणि निर्दयी असणाऱ्या अनेक व्यक्ती समाजात वावरत असतात पण असा प्रकार सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच घडला आहे.
मयत शंकर जाधव आणि पुतण्या आरोपी यांच्यात शेतीच्या कारणावरून वाद होता. त्यांचे प्रकरण न्यायालयात देखील गेलेले होते. दोन वर्षांपूर्वी माढा येथील न्यायालयात एक दावाही दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर सोमवारी खुनाची ही घटना घडली. (Brutal killing in Solapur district due to agricultural dispute)डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते आपल्या घरी झोपलेले असताना, शिवाजी जाधव हा परमेश्वर जाधव, अजित जाधव आणि आकाश जाधव तेथे आले. इतरांनी शंकर जाधव यांना पकडून ठेवले तर शिवाजी जाधव याने कुऱ्हाडीने वार केले. कुऱ्हाडीने त्यांचे मुंडके धडावेगळे करून, ते सोबत घेऊन तो दुचाकीवर गावभर फिरला. यावेळी त्याचे साथीदार मात्र पसार झाले होते. आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !