BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ एप्रि, २०२२

एक महिन्यात उष्माघाताने राज्यात एकवीस मृत्यू !

 



मुंबई : यावर्षीच्या उन्हाचा कडाका सर्वाधिक जाणवत असतानाच केवळ एका महिन्यात राज्यात २१ जणांचा  केवळ उष्माघाताने मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


मागील वर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झालेला असताना उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढलेली होती. उन्हाचा कडाका आणि अवकाळी पाऊस, गारपीठ असा सामना करावा लागत असताना अधूनमधून उष्णतेची लाट देखील येत राहिली. उष्णतेच्या लाटेचा विदर्भात अधिक त्रास होत असून अजून मे महिन्याच्या उष्णतेला सामोरे जायचे आहे. मार्च महिन्यात उष्माघाताचे प्रकार वाढीस लागले आणि उष्माघाताने ३०० पेक्षा अधिक लोक आजारी पडले तर २१ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेपासून दक्षता घेण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत होते पण तरीही कष्टकरी माणसाला उन्हात काम केल्याशिवाय पर्याय नसतो आणि अशा घटना घडतात. 


उष्माघाताने मृत्यू झालेल्या २१ नागरिकात नागपूरमधील ७ जणांचा समावेश आहे. नागपूर विभागात उष्णतेशी संबंधित रुग्णाची संख्या २६२ वर गेली आहे. जळगाव जिल्ह्यात  ४, अकोला - ३, जालना - २ आणि अमरावती, उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात प्रत्येकी एका उष्माघाताच्या बळींची नोंद झाली आहे. मागील वर्षी उष्माघाताने एकही बळी गेला नव्हता परंतु २०१६ ते २०१९ या कालावधीत ४३ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद आहे. मागील महिन्यात उष्णतेचा त्रास होऊन राज्यात ३३८ नागरिक आजारी पडले आहेत यातील अकोला जिल्ह्यात २९, पुणे - २१, नाशिक - १४ औरंगाबाद - १० लातूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी १ अशा रुग्णांचा समावेश आहे. अजूनही उन्हाची तीव्रता वाढत असून संपूर्ण मे महिना शिल्लक आहे त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून रक्षण करण्याची दक्षता घेणे अत्यावश्यक बनले आहे.    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !