BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ एप्रि, २०२२

पोलिसाने दंड करताच पट्ठ्याने अंगावर ओतले रॉकेल !

 



सातारा : वाहतूक पोलिसाने दुचाकी चालकाला सात हजार रुपयांचा दंड भरायला सांगितला आणि पट्ठ्याने थेट अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचाच प्रयत्न केला आणि भर रस्त्यावर एकच गोंधळ उडाला.


वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून वेगवेगळे कायदे केले जात आहेत, दंडाच्या रकमा वाढविल्या जात आहेत पण वाहन चालकांना कसलीही शिस्त लागत नसल्याचे रस्त्यारस्त्यावर पाहायला मिळते आणि अपघात होताना दिसतात. वाहनाची व्यवस्थित देखभाल तर नसतेच पण वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही रस्त्यावर वेगाने आणि वाकडीतिकडी वाहने चालवली जात असल्याचे सर्वच शहरात दिसून येते. वाहतूक पोलीस काही वाहनावर कारवाई देखील करतात पण कारवाई करू नये म्हणून लगेच गाव पुढाऱ्यांचे फोन पोलिसांना येत असतात. वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली जाते आणि यामुळे प्रकरण आणखी वेगळ्या वळणावर पोहोचते. सातारा येथील एका बहाद्दराने तर पोलिसांनाच धमकावत अंगावर रॉकेल ओतून घेतल्याची घटना घडली आहे.


शहरातील रस्त्यावरून युवराज उत्तम लोखंडे हा दुचाकी चालक दुचाकीवर तिघांना घेवून निघाला तर होताच पण त्याच्या दुचाकीला पुढच्या बाजूला क्रमांकाची प्लेट देखील नव्हती. अर्थातच वाहतूक पोलीस हवालदार सोमनाथ शिंदे यांनी त्याला रोखले. शेंडे हे बस स्थानकाच्या परिसरात कर्तव्यावर होते. या परिसरात गर्दी तर होती आई या भागातून जाताना लोखंडे हा एका दुचाकीवर तिघे बसवून निघाला होता. त्यातच येथे एक एस टी बस बंद पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली होती. अशा परिस्थितीत तिब्बल शीट आलेल्या लोखंडे याला पोलिसांनी थांबवले आणि वाहन परवान्याची विचारणा केली. वाहन परवाना नसताना देखील दुचाकीवर तिघे बसून निघाले असल्याने वाहतूक पोलिसांनी त्याला बाजूला घेतले. 


दुचाकीच्या मागच्या बाजूला नंबर प्लेट होती परंतु पुढच्या बाजूला नव्हती शिवाय त्याच्या दुचाकीला प्रेशर हॉर्न बजावलेला होता. वाहन चालविण्याचा परवाना नसताना तिघांना बसवून दुचाकी चालवत होता. पोलिसांनी सगळा हिशोब केला आणि त्याला सात हजारचा दंड सांगितला. दंडाची रक्कम ऐकून युवराज लोखंडे याच्या डोक्यावरचे केस उभे राहिले. दंडावरून लोखंडे याने पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. दंड भरायला आपल्याकडे पैसे नसल्याचेही त्याने सांगितले. दंड कमी करण्यासाठी बराच वेळ त्याने वाहतूक पोलिसांशी वाद देखील घातला पण पोलिसांनी काही केल्या त्याचा दंड कमी केला नाही. 


काही करून पोलीस दंडाची रक्कम कमी करीत नाहीत हे पाहून लोखंडे याने दुचाकी तेथेच ठेवली आणि पायी चालत तो निघून गेला. काही वेळाने तो आला पण त्याने बस स्थानकाच्या परिसरात एकच गोंधळ उडवून दिला. परत येताना त्याने आपल्या सोबत रॉकेलचा एक डबा आणला.'थांबा आता, तुम्हाला दाखवतोच, तुमची नोकरीच घालवतो' असे धमकावत त्याने अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Fined by traffic police Attempted suicide)गजबजलेल्या परिसरात त्याने केलेल्या या धिंगाण्यामुळे रस्त्यावर शेकडो लोक जमा झाले. एका जागी थांबून त्याचा हा सर्व प्रकार लोक पहात होते. एकूण प्रकाराने तर अनेक लोकांनी तोंडात बोटे घातली. 


दोन गुन्हे दाखल !
पोलिसांनी तातडीने पीसीआर वाहन मागवून घेतले आणि लोखंडे याची रवानगी पोलीस ठाण्याकडे केली. आपण केलेला प्रकार आता अंगाशी येत असल्याची जाणीव युवराज लोखंडे याला झाली आणि त्याने आपली चूक कबूल करायला सुरुवात केली. भर रस्त्यावर एवढा प्रकार झाल्यावर केवळ चूक कबूल केली म्हणून पोलीस सोडणार नव्हते. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा दाखल केला. सात हजाराचा दंड न भरता भर रस्त्यात केलेली हिरोगिरी त्याला भलतीच महागात पडली आहे. 


म्हणून आत्महत्या --
वाहतुकीच्या नियमांचा आपल्याकडून भंग झाला हे लोखंडे याने मान्य केले आहे पण दंडाची मोठी रक्कम असल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पुढे आली आहे. वाहतुकीचे नियम सर्रास मोडले जातात पण त्यासाठी आकारण्यात येत असलेला दंड हा अवास्तव असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकातून उमटत आहे.  कोरोनाच्या काळात लोखंडे याची नोकरी गेलेली आहे त्यामुळे तो बेकार अवस्थेत असताना एवढा  मोठा दंड त्याच्या आवाक्याबाहेर असल्याचे वाटले.  


हे देखील वाचा :>>> 

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !