उस्मानाबाद : राज्यातील उष्णता वाढत असतानाच शेतातील बांधावर बसून घोटभर पाणी पिताच एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून राज्यातील उष्माघाताचा ( Heat Stroke) हा तिसरा बळी ठरला आहे.
राज्यातील तापमान वेगाने वाढत असताना उष्णतेची लाट आली आहे त्यामुळे नागरिक, विशेषत: शेतकरी आणि कष्टकरी हैराण झाले आहेत. वरून सूर्य आग ओकत असताना त्याकडे दुर्लक्ष करून काम करणे आता जीवावर बेतू लागले आहे. उष्माघाताच्या तक्रारी वाढत असून उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या पाच सहा दिवसांपासून तापमान प्रचंड वाढलेले आहे. दररोज ४० अंश सेल्सियसच्या पुढेच पारा चढत असल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे परंतु शेतकरी आणि कष्टकरी यांना कामासाठी बाहेर पडण्यावाचून पर्याय नाही. असे असले तरी ही उष्णता जीवावर बेतू लागली आहे. उसमानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यातील हसेगाव येथील एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू ओढवला असून ( Farmer Dies due to Heatstroke in Osmanabad) जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे.
लिंबराज सुकळे हे पन्नास वर्षे वयाचे शेतकरी शेतात काम करीत होते. शेतात कडबा बांधण्याचे काम करून ते बांधावर आले. कडक उन्हात काम केल्याने त्यांना तहानही लागली होती. घाईघाईने ते पाणी पिले आणि पाणी पीत असतनाच शेतातच उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले परंतु त्यांचा मृत्यू झालेला होता. शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. राज्यात गेल्या चार पाच दिवसापासून उष्णतेची लाट असून उष्माघातामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता तीन झाली आहे.
आधीचे दोन बळी !
उस्मानाबाद येथील शेतकरी उष्माघाताने मृत्युमुखी पडले असून हा तिसरा बळी ठरला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील सारकिन्ही गावातील समाधान शामराव शिंदे या पन्नास वर्षे वयाच्या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहेत तर जळगाव जिल्ह्यातही अंमळनेर तालुक्यातील मांडळ या गावाच्या ३३ वर्षीय जितेंद्र संजय माळी यांचा कडक उन्हांत काम केल्यामुळे उष्माघाताने मृत्यू ओढवला होता.
------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !