BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जून, २०२२

पेन्शनसाठी आजारी हवालदाराने दिला आपला जीव !

 


सोलापूर : आपल्या कुटुंबाची आणि आपल्या आरोग्याची पर्वा न करता सेवा करणाऱ्या पोलीस हवालदाराने आपल्या हक्काच्या पेन्शन रकमेसाठी आत्महत्या केली असून ही बाब अत्यंत धक्कादायक मानली जात आहे. 


शासकीय अधिकारी, कर्मचारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याच्या हक्काची काही रक्कम शासनाकडून येणे असते. शासन ती देत असते परंतु झारीतील शुक्राचार्य आडवे येतात आणि त्यामुळे ही रक्कम मिळण्यात प्रचंड विलंब  होतो. निवृत्तीमुळे एकीकडे मासिक वेतन बंद झालेले असते आणि दुसरीकडे हक्काची असणारी पेन्शन देखील वेळेवर मिळत नाही त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रचंड कोंडी होते. पोलीस कर्मचारी तर सेवाकाळात आपल्या कुटुंबाची आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी न करता जनतेच्या सेवेत सज्ज असतो. 


सरकारी कामात त्याला स्वत:कडे पाहायला वेळ देखील मिळत नाही. कोरोनाच्या काळात पोलीस कसे देवदूत होऊन रस्त्यावर अखंड उभे होते हे सर्वांनीच केवळ पहिले नाही तर अनुभवले देखील आहे. काही मुठभर पोलिसांमुळे खाकी बदनाम होताना दिसत असली तरी खिशातले पैसे खर्च करून गरजूंना मदत करणारे पोलीसही दिसतात. आयुष्यभर सेवा केल्यानंतर निवृत्ती वेतन हा त्याचा हक्क असतो पण हक्क न मिळाल्याने सोलापूरच्या एका पोलिसाने आत्महत्या करून आपल्या जीवनाचा शेवट केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.


सोलापूर येथील कल्याण दगडू गावसाने हे नाशिक येथील कारागृहात हवालदार पदावर काम करीत होते. उस्मानाबाद येथे सेवेस असलेल्या गावसाने यांना असाध्य आजार होता आणि त्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे करण्यात आली होती. त्यांच्या आजारावर खर्च करण्यासाठी त्यांचा पगार अपुरा पडत होता. उपचारासाठी पैसे हवेत म्हणून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम घेवून उपचारासाठी खर्च करता येतील असा त्यांचा मनसुभा होता. निवृत्ती घेतल्यामुळे मासिक पगार बंद झाला आणि पेन्शनची रक्कम देखील त्यांना मिळाली नाही. शासनाकडून येणाऱ्या अन्य रकमाही त्यांना मिळेनाशा झाल्या त्यामुळे आगीतून उठून फुफाट्यात पडल्याची त्यांची अवस्था झाली. हेलपाटे घालून आणि विनंत्या करून गावसाने थकले पण त्यांची हक्काची रक्कम संबंधित लिपिकाच्या खाबुगीरीमुळे त्यांना मिळत नव्हती.


आजारावर खर्च करण्यासाठी पैसे मिळतील म्हणून त्यांनी निवृत्ती घेतली पण त्यामुळे पगारही बंद आणि पेन्शन देखील नाही अशा अवस्थेमुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिकट बनली. सेवापुस्तक वेतन पडताळणी करून घेण्यासाठी संबंधित लिपिकास त्यांनी दोन हजार रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी फोन पे करून पाठवली होती तरीही त्यांचे काम होत नव्हते. अखेर त्यांनी औरंगाबाद कारागृह निरीक्षकांना पत्र लिहिले आणि महिन्यात आपली देणी न मिळाल्यास आत्महत्या करीन असे पत्रातून सांगितले. 


या पत्राची त्यांनी पोहोच देखील घेतली पण त्यांच्या या पत्राची कुणी दाखल घेतली नाही. निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम द्या किंवा मग पुन्हा सेवेत हजर करून घ्या अशी त्यांनी मागणी केली होती.  काही केल्या आपल्या हक्काची रक्कम आपल्या गरजेसाठी वेळेवर मिळत नसल्याने अखेर त्यांनी आपल्या राहत्या घरी सोलापुरात गळफास घेवून आत्महत्या केली. (Sick constable commits suicide for pension)  


लाचखाऊमुळे जीव गेला !
गावसाने यांचा जीव अधिकारी आणि कर्मचारी यांच्या लाचखाऊ प्रवृत्तीमुळे गेला असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. नाशिक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करीत नव्हते त्यामुळे हवालदार गावसाने त्रस्त होते. या त्रासातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकानी केला आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !