मंगळवेढा : सोलापूर - सांगोला रस्त्यावर अचानक धावत्या कारला शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून कारचे नुकसान झाले असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सदर घटनेबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अलीकडे धावत्या वाहनांना आग लागण्याचे प्रकार वाढू लागले असून राज्य परिवहन महामंडळाच्या बस, ट्रक आणि कार यांना आग लागून आगीत ही वाहने जळून खाक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात सद्या कडक उन्हाळा असून सोलापूरचे तापमान तर ४३ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. सोलापूर येथून सांगोला तालुक्यात निघालेल्या एक विद्यार्थ्याच्या गाडीला मंगळवेढा हद्दीत अचानक आग लागल्याची घटना समोर आली असून या घटनेची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सांगोला तालुक्यातील घेरडी येथील ऋषिकेश रामहरी लवटे हा २२ वर्षाचा तरुण सोलापूरकडून आपल्या गावी निघाला होता एम एच ०८ झेड ८३०० ही रेनॉल्ट डस्टर ही गाडी स्वतः चालवत होता. त्याच्यासोबत गाडीत अन्य कुणीही नव्हते. मंगळवेढ्यातुन पाठखळ मार्गाने तो घेरडीकडे निघाला असताना काशीद मळ्याजवळ ही घटना घडली. गाडीच्या इंजिनमधून वायरिंग जळाल्यासारखा वास येऊ लागल्यामुळे ऋषिकेशने गाडी रस्त्याच्या बाजूला घेत थांबवली. बॉनेट उघडून पहिले असता इंजिनमधून जाळ येऊ लागल्याचे दिसले. गाडी पेटली असल्याचे दिसताच ते गाडीपासून दूर गेले आणि काही क्षणात ही आग भडकली. आजूबाजूचे लोक देखील यावेळी जमा झाले.
अग्निशामक दलाशी संपर्क साधून गाडीला लागलेली आग विझविण्यात आली. वेळीच दक्षता घेतल्यामुळे या घटनेत जीवितहानी झाली नाही परंतु गाडीचे चार लाख रुपयांचे नुकसान मात्र झाले आहे. धावत्या गाडीत शॉर्टसर्किट झाल्यामुळेच गाडीला आग लागली असल्याचे ऋषिकेश लवटे यांनी म्हटले आहे. (The running car caught fire due to a short circuit) सदर घटनेबाबत मंगळवेढा पोलिसात फिर्याद देण्यात आली असून सहाय्य्क पोलीस फौजदार निंबाळे हे अधिक तपास करीत आहेत.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !