नवी दिल्ली : महागाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाचा एक दिलासादायक निर्णय आला असून खतांच्या अनुदानात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करण्यात आली आहे. देशातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
शेतकरी सतत वेगवेगळ्या संकटात अडचणीत येत असतो, शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही आणि शेती उत्पादन घेताना खर्चात सतत वाढ होत असते. त्यात काही व्यापारी खते आणि बियाणे बनावट देवून शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणले जाते. अशा विविध संकटात अडकत असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासादायक बातमी मिळाली आहे. जागतिक बाजारपेठेत खतांच्या किमती वाढत असताना केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी फॉस्फोरस तसेच पोटॅशिअम खताच्या अनुदानात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी करीत हंगामासाठी ६० हजार ९३९ कोटींचे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
मागील आर्थिक वर्षात याच खतासाठी ५७ हजार १५० कोटीचे अनुदान देण्यात आले होते परंतु यावर्षी ६० हजार ९३९ कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्येक पोत्यामागे रब्बी हंगामातील १६५० रुपयांच्या तुलनेत २५०१ रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. दोन वर्षात या अनुदानात पाच पटीने वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील यद्धामुळे नैसर्गिक वायू आणि कच्च्या मालाचे दर भडकले असल्यामुळे जागतिक बाजारात खतांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. (Fertilizer subsidy increased by more than fifty per cent) अशा परिस्थितीत केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !