BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ एप्रि, २०२२

लग्न लाऊन देतो म्हणून आणली बनावट नवरी !



मोहोळ : बनावट नवरी उभी करून लग्न लावण्याचा प्रकार ऐनवेळी उघडा पडला आणि लग्नाशिवाय वरात पोलीस ठाण्यात पोहोचण्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली आणि कथित नवरीसह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हल्ली कोण कुणाला कसे फसवेल आणि कुणाला कशी 'टोपी' घालेल याचा भरवसा राहिलेला नाही, बाजारात अनेक नकली वस्तू मिळतात हे सगळ्यांनाच माहित आहे पण अलीकडे लग्नासाठी नवरी देखील बनावट मिळू लागली आहे.  बनावट नवरी उभी करून लग्न लावायचे आणि लग्नानंतर दागिने घेवून नवरी बेपत्ता होण्याचे अनेक प्रकार घडलेले असून अलीकडे हे प्रकार वाढलेले आहेत. अशा घटनामुळे मोठी फसवणूक तर होतेच पण कुटुंबावर मोठा मानसिक आघात देखील होतो. मोहोळ तालुक्यात अशी एक घटना घडली पण लग्नाच्या आधीच हा प्रकार उघडा पडला त्यामुळे एक कुटुंब मोठ्या संकटातून वाचले. लग्न लागण्याआधीच या लग्नाची वरात पोलीस ठाण्यात आणि तेथून थेट तुरुंगात पोहोचली आहे. 


मोहोळ तालुक्यातील खंडोबाची वाडी येथील बंडू महिपती नरके यांचा विवाह जमविण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील एजंट युवराज विठ्ठल जमदाडे याला सांगण्यात आले होते. जमदाडे याने लग्न जमविण्यासाठी सव्वा लाख रुपये द्यावे लागतील आणि मुलगी दाखविल्यानंतर पाच हजार रुपये आणि साखरपुडा ठरल्यास वीस हजार रुपये वेगळे द्यावे लागतील असे सांगितले.  बंडू नरके यांना मुलगी पाहण्यासाठी सोलापूर येथे बोलावण्यात आले.  युवराज जमदाडे हे एका महिलेच्या सोबत बस स्थानकावर आले तेंव्हा बंडू नरके यांच्यासह त्यांचे चुलत भाऊ, मामा, भावजय यांना  एजंट जमदाडे यांनी मुलगी दाखवली. या मुलीचे नाव स्वाती पवार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वातीचे आई वडील यांचा मृत्यू झाला असून आम्हीच तिचे नातेवाईक आहोत असे देखील सांगण्यात आले आणि मुलगी पसंत आहे का ? अशी विचारणा केली. 


'मुलगी पसंत आहेच तर मग वेळ कशाला घालवायचा ? साखरपुडा करून टाकू' असे म्हणत असे म्हणत साखरपुडा देखील उरकला आणि लग्नाची तारीख देखील लगेच निश्चित करण्यात आली.  नरके यांनी लग्नाची तयारी सुरु केली आणि मंडप देखील घालण्यात आला. दुपारी एक वाजताच मुहूर्त ठरला होता आणि नवरीची वाट पाहत सगळे खोळंबले होते. 'आमची गाडी बंद पडल्यामुळे आम्ही एस टी ने अनगर पर्यंत आलो आहोत, आम्हाला गाडी पाठवा असा फोन आला त्यामुळे नरके यांनी गाडी देखील पाठवली. या गाडीने मुलगी आणि पाहुणे लग्नमंडपात पोहोचले. लग्नासाठी नवरी उभी करताना तिच्या पायात जोडवे घालण्याच्या वेळेस वेगळाच प्रकार समोर आला आणि बिंग फुटले. 


मुलीकडे याबाबत चौकशी केली असता 'मुलीला मराठी बोलता येत नाही' अशी बतावणी करण्यात आली पण याकडे दुर्लक्ष केले गेले नाही. अधिक चौकशी केली तेंव्हा या मुलीचे नाव स्वाती पवार नसून सायरा रफिक शेख (विडी घरकुल, सोलापूर ) असे असल्याचे उघड झाले. खोटी नवरी दाखवून आपली पंधरा हजार रुपयांची फसवणूक केली गेली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे बंडू नरके यांनी लगेच मोहोळ पोलिसात धाव घेतली आणि लग्नाची वरात लग्नाच्या आधीच पोलिसाच्या दारात पोहोचली !


असे फुटले बिंग !

लग्नाच्या वेळेलाच पहिल्यांदा पायातल्या बोटात जोडवे घातले जाते. असेच जोडवे या बनावट नवरीच्या पायाच्या बोटात घातले जात असताना बिंग फुटले. या मुलीच्या बोटात पूर्वी जोडावे असल्याच्या खुणा बोटावर दिसल्या. लग्नाआधीच पायाच्या बोटात जोडव्याचे वण बोटाला दिसल्यामुळे  काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला आणि येथेच नवरीचे बिंग फुटले. 



यांना झाली अटक ! 

एजंट युवराज विठ्ठल जमदाडे (भोसे ता. पंढरपूर ) बनावट नवरीचा भाऊ सर्फराज सलीम, चैतन्य प्रल्हाद गायकवाड (सोलापूर) शिवगंगा चैतन्य गायकवाड (सोलापूर) शुभांगी सोमनाथ अधटराव (शिरापूर , मोहोळ), महानंदा चिदानंद म्हेत्रे (सोलापूर)  आणि बनावट नवरी सायरा शेख या सात जणांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.(Fake bride Fraud exposed)त्यानुसार सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !