BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ एप्रि, २०२२

आरोपीच्या मृत्युप्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल !

 


सोलापूर : पोलीस कोठडीतील आरोपी भीमा काळेच्या मृत्युप्रकरणी दोन पोलीस अधिकारी यांच्यासह पाच पोलीस कर्मचारी यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. 


पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपींची पूर्ण जबाबदारी पोलिसांची असते. त्याची वैद्यकीय देखभाल देखील पोलिसांनी करायची असते. भीमा काळे या आरोपीचा कोठडीत असताना मृत्यू झाला त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांवर करणायत आला होता.   दरोडा आणि  जबरी चोरी गुन्ह्यातील पारधी समाजातील आरोपी भीमा काळे यास कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. काळे  याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हे अन्वेषण विभागाने फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ आणि   पाच पोलीस कर्मचाऱ्यां विरुद्ध  विजापूर नाका पोलीस ठणय्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच  डान्स बार प्रकरणात त्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले होते. आरोपी भीमा काळे याचा मृत्यू नंतर त्याची पत्नी आणि मुलांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थेट पोलिसांवर आरोप केला होता.


भांबुरे वस्ती, पारधी वस्ती कुर्डूवाडी (माढा) येथील भीमा रज्जा काळे (वय ४२) हा जिल्हा कारागृहात असताना २२ सप्टेंबर २०२१ रोजी त्याला वर्ग करून ताब्यात घेतले होते आणि २२ ते २५ सप्टेंबर अशी न्यायालयाकडून पोलीस कोठडी मंजूर करून घेण्यात आली होती विजापूर नाका पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याच्या तपासासाठी त्याची कोठडी मिळविण्यात आली होती. पोलीस कोठडीत असताना आरोपीस ताप खोकला सर्दी तसेच उलट्या होऊ लागल्या तसेच त्याचे दोन्ही पाय सुजल्यामुळे त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचार सुरु असताना ३ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकानी पोलिसावर मारहाण केल्याचा आरोप केला होता. 


सोलापूर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उप अधीक्षक सिद्रामप्पा गजा यांनी याबाबत फिर्याद दिली असून अटकेतील आरोपी भीमा काळे याने गुन्हा कबूल करावा आणि गुन्ह्यातील मुद्देमाल काढून द्यावा यासाठी आरोपी काळे यास मारहाण करण्यात आली होती. गुन्हयाचे तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक  कोल्हाळ, हवालदार श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोलीस नाईक  शिवानंद दत्तात्रय भिमदे, अंबादास बालाजी गड्डम, पोलीस शिपाई  अतिश काकासाहेब पाटील, व नाईक लक्ष्मण पोमु राठोड यांनी पोलीस कस्टडीतील आरोपीस मारहाण केली आहे. विजापूर नाका पोलीस ठाणे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील यांनी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस  निरीक्षक कोल्हाळ यांना गुन्हयाच्या तपासामध्ये मार्गदर्शक सूचना दिल्याचे देखील दिसून आलेले नाही.


२२ सप्टेंबर २१ रोजी रात्री ८ वाजण्याच्य सुमारास तपास अधिकाऱ्याने आरोपी भीमा काळे यास वरिष्ठ अधिकारी यांच्यासमोर समक्ष हजर केले असताना भीमा हा लंगडत असल्याचे आणि त्याचे दोन्ही पाय काळसर दिसत असल्याचे निदर्शनास आले तरीही आणि  आरोपीला वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवाय विजापूर नाका पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण कक्षात सीसीटीव्ही आवश्यक असताना देखील सदर ठिकाणी प्रभारी अधिकारी यांनी ते उपलब्ध केलेले दिसून आले नाही. सर्वोच्च न्यायालय आणि  उच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे पोलीस ठाणे आवारात व प्रत्येक कक्षात सीसीटिव्ही कॅमेरे सुस्थितीत ठेवून त्याची छायाचित्रण जतन करण्याचे प्रशासकीय जबाबदारी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यावर असते. 


 🅾️  यांच्यावर गुन्हा दाखल 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार मारुती कोल्हाळ, हवालदार श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोलीस नाईक शिवानंद दत्तात्रय भीमदे, अंबादास बालाजी गड्डूम, लक्ष्मण पोमू राठोड  पोलीस शिपाई अतिश काकासाहेब पाटील या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान कलम ३०४, ३३०, १६६, ३४ अन्वये विजापूर नाका पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उप अधीक्षक सिद्रामप्पा गजा यांनी ही फिर्याद दिली आहे.  


 🅾️ आरोपीच्या मृत्यूस कारणीभूत 

आरोपी भीमा काळे यास केलेल्या मारहाणीमुळे त्याला जखमा झाल्या होत्या शिवाय आरोपी काळे हा मानसिकदृष्ट्या सक्षम नाही हे माहित असूनही त्याची वैद्यकीय आजारपणे आणि मारहाण यामुळे झालेल्या जखमा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यास तत्काळ वैद्यकीय मदत न देता त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा आरोप सदर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !