BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मार्च, २०२२

युक्रेन : भारतीय विद्यार्थ्याचा गोळीबारात दुर्दैवी मृत्यू !

 



युक्रेन- रशिया यांच्यातील युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या घटनेने भारतीयांना धक्का बसला आहे. 


युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु झालेल्या युद्धामुळे तेथील परिस्थिती अशांत बनली आहे. कमी खर्चात आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते म्हणून असंख्य भारतीय तरुण येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. या भारतीय विद्यार्थ्यांना युद्धाची चाहूल लागल्यानंतर त्यांनी तेथून निघून भारतात येण्याचा प्रयत्न केला पण त्या आधीच परिस्थिती चिघळली आणि विमानसेवा बंद पडली त्यामुळे भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. यातील अनेक विद्यार्थी सुखरूप भारतात परतले असले तरी अद्याप असंख्य भारतीय युक्रेनमध्येच अडकलेले आहेत. अशा परिस्थितीत ही धक्कादायक बातमी समोर आली आणि भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. 


भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक भारतीय विद्यार्थी गोळीबारात मृत्युमुखी पडला असल्याची माहिती दिली आहे, परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत एक ट्वीट केले आहे. "सांगायला अत्यंत दु:ख होते की, खाराकीव येथील गोळीबारात आज सकाळी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालय त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. त्याच्या कुटुंबियांसाठी आम्ही तीव्र संवेदना व्यक्त करतो" असे ट्वीट परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केले आहे. भारतीयांना या घटनेची माहिती मिळाली तेंव्हापासून भारतात चिंता व्यक्त होऊ लागली आहे. अजूनही अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत.


भारताच्या परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीतील गोळीबारात मृत्युमुखी पडलेला भारतीय विद्यार्थी मूळ  कर्नाटक राज्यातील चलागेरी येथीलअसून रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शेखराप्पा ग्यानगौडा नवीन असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो एमबीबीएस च्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. या विद्यार्थ्याच्या मृत्यूने भारताला धक्का बसला असून भारतीयातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. अनेक भारतीय विद्यार्थी सुखरूप परत येत असल्याने दिलासा मिळाला होता परंतु आता अशाही धक्कादायक घटना समोर येऊ लागल्याने चिंतेचे वातावरण बनले आहे.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !