BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ मार्च, २०२२

ऊस जळतोय, शेतकरी महिलेचा आक्रोश !

 



पंढरपूर : शेजाऱ्याने रस्ता अडविल्याने शेतातला ऊस करपू लागल्याचा आक्रोश करीत आंबेचिंचोली येथील शेतकरी महिलेने आपल्या कुटुंबासह आज आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. 


विजेच्या समस्येने शेतकरी अस्वस्थ झाला असतानाच पंढरपूर तालुक्यातील एका शेतकरी महिलेने सगळ्यांचेच लक्ष त्यांच्या अडचणीकडे केंद्रित केल्याचे दिसत आहे. कर्जबाजारी झाल्याने मगरवाडी येथील सुरज मगर या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याने राज्यभर खळबळ निर्माण झाली असतानाच आता शेतकरी महिलेने थेट आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. शेजाऱ्याने जाणीवपूर्वक आपला रस्ता अडविला असल्यामुळे आपला ऊस करपू लागला असल्याची त्यांची तक्रार आहे. 


पंढरपूर तालुक्यातील आंबेचिंचोली येथील पद्मिनी मोहन पाटील या शेतकरी महिलेने शेजारील शेतकऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. दंडेलशाही करून शेजारी शेतकऱ्याने आपला वहिवाटीचा रस्ता अडविला असल्यामुळे शेतातला ऊस गाळपासाठी नेता येत नाही. त्यामुळे ऊस जागेवर करपू लागला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयसमोर आज ७ मार्च रोजी कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी  दिला आहे. तहसीलदार यांच्यासमोर वंशपरंपरेने कायमस्वरूपी आणि विना मोबदला रस्ता देण्याचे २००९ साली ठरलेले होते परंतु तरीही आपली अडवणूक करून, नुकसान व्हावे या कपटबुद्धीने रस्ता अडविण्यात आला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 


पंढरपूर तहसीलदार यांच्याकडे रस्त्याबाबत आपण अर्ज केला होता, त्याची दखल घेत तहसीलदार यांनी  पंचनामा देखील केला आहे पण अद्याप रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. रस्ताच अडविला असल्यामुळे शेतातील ऊस गाळपासाठी पाठविता येत नाही. उभा ऊस करपू लागला आहे त्यामुळे आपल्या कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा देत त्यांनी आपली व्यथा मांडून प्रशासनाचेही लक्ष वेधले आहे.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !