BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ मार्च, २०२२

बलात्काराच्या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षकाने मागितली ३७ लाखांची लाच !

 



मुंबई : एका बलात्काराच्या गुन्ह्याला रफादफा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ३७ लाखांची लाच मागितल्याचे प्रकरण उघडकीस आले असून यातील ७ लाख रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडले देखील आहे.  (ACB trap)


पोलीस आणि महसूल विभाग हा भ्रष्टाचाराबाबत सदैव आघाडीवर आहे हे काही नवीन नाही. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकणारे बहुतेक महसूल आणि पोलीस खात्यातील अधिकारी कर्मचारी असल्याचे दिसून येते.  आजवर पोलीस खात्यातील अनेक बडे मासे या गळाला लागलेले आहेत पण सामान्य पोलीस उपनिरीक्षक तब्बल ३७ लाखांची डील करतो असे धक्कादायक प्रकरण लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणले आहे. एकीकडे महिलाविषयक कायदे सशक्त करण्याची भाषा वापरली जाते आणि महिलांना न्याय देण्याच्या गप्पा केल्या जातात तर दुसरीकडे एका महिलेवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण दाबून टाकण्याचे कारस्थान चक्क एका पोलीस उपनिरीक्षकानेच केल्याचे समोर आले आहे. (Bribe case)


महिलेची समजूत घालून बलात्काराचा गुन्हा दाखल करीत नाही असे सांगून  भरत लक्ष्मण मुंढे नावाच्या एका पोलीस उपनिरीक्षकाने वेगवेगळ्या व्यक्तीसाठी म्हणून तब्बल ३७ लाखांची लाच मागितली आणि यातील ७ लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले. ३३ वर्षे वयाचा हा पोलीस उप निरीक्षक मुंबईच्या ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. या पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास मुंढे याच्याकडे आला होता. या गुन्ह्यात तपास करून आरोपीला जेरबंद करणे अपेक्षित होते पण याचा तपास वेगळ्याच दिशेने गेला. 


आरोपीशी संपर्क साधून या पोलीस उपनिरीक्षकाने गुन्ह्यात अटक करीत नाही यासाठी आरोपीकडे लाचेची मागणी केली. लाच नाही दिली तर आरोपीच्या नातेवाईकांना देखील या गुन्हात सह आरोपी करण्याची धमकी या उप निरीक्षकाने दिली. बलात्काराची तक्रार करू नये म्हणून पिडीतेची समजूत घालण्याची हमी घेत त्याने तब्बल ३७ लाख रुपये लाच म्हणून मागितले. यातील ५ लाख स्वत:साठी, २ लाख वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासाठी आणि ३० लाख रुपये पिडीत महिलेसाठी अशी विभागणी त्याने केली. तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली. 


तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली आणि या पडताळणीत पोलीस उपनिरीक्षक मुंढे याने ३७ लाख रुपयांची लाच मागितल्याची बाब आढळून आली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने ( Anti Curruption Bureau) सापळा लावला. तक्रारदाराकडून ३७ लाख रुपयांपैकी ७ लाख रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक या सापळ्यात अडकला. सात लाखांची लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक भरत मुंढे याला अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारचे अधिकारी असतील तर पिडीत महिलांना न्याय कसा मिळणार आणि महिलांवरील अत्याचार कसे थांबणार ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. (Police sub-inspector arrested for taking bribe in rape case )  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !