BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मार्च, २०२२

सोलापूर जिल्ह्यातील लाखो ग्राहकांना महावितरण देणार 'शॉक' !

 




सोलापूर : कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याने आणि चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने आता सोलापूर जिल्ह्यातील लाखो थकबाकीदार ग्राहकांना महावितरण मोठा शॉक देणार आहे. (Mahavitaran)


महावितरण प्रचंड आर्थिक अडचणीत आलेली असल्याने आणि विविध वर्गवारीच्या ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची वीज बिले थकित असल्यामुळे वसुलीसाठी महावितरण सतत एकेक मोहीम राबवीत आहे. ग्राहकांनी थकित बिले भरावीत म्हणून एकेक योजनाही आणत आहे, बिले थकलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित देखील करण्यात येत आहे परंतु अपेक्षित वसुली होताना दिसत  नाही. चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना सुरु झाल्याने महावितरण आता अधिकच सक्रीय झाले असून जवळपास सहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याचे महावितरणचे नियोजन आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख ७५ हजार ४६८ वीज ग्राहकांकडे ४ हजार दोनशे १३ कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, शेती, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे, सार्वजनिक सेवा आणि अन्य घटकांचा यात समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांच्या बिलाची किती थकीत रक्कम आहे याकडे न पाहता थेट ग्राहकांचा वीज पुरवठा (Power supply) तोडला जाणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यात थकीत ग्राहकांना मोठा शॉक बसणार हे उघड आहे. त्यादृष्टीने महावितरण सज्ज झाले असून थकबाकीदार ग्राहकांना बिले भरणे किंवा अंधारात बसणे यापैकी एक मार्ग निवडावा लागणार आहे. 


उर्जा मंत्री नितीन राउत यांनी वीज कनेक्शन तोडले जाणार असल्याचे स्पष्ट करून बिले भरण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे ही मोहिक अधिक तीव्र होण्याचे संकेत काल पुन्हा एकदा मिळाले आहेत. बिले न भरल्यास भारनियमन करण्याचा इशारा देखील वीजमंत्र्यांनी दिलेला आहे. यातून कुठलाही थकबाकीदार सुटणार नाही अशीच मोहीम महावितरण सुरु करणार आहे. उन्हाळा सुरु झाल्यामुळे विजेची मागणी वाढू लागली आहे तर राज्याला महागड्या दराने बाहेरून वीज खरेदी करावी लागत आहे. शिवाय कोळशाची टंचाई हे एक मोठे संकट आहे त्यामुळे महावितरण वसुलीबाबत अधिक दक्ष झाली आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील घरगुती ग्राहकाकडे १ लाख ७९ हजार ४४६ ग्राहक असून ३६ कोटी ५१ लाख रुपयांची घरगुती वापराची थकबाकी आहे. व्यावसायिक ग्राहकांकडे ६ कोटी ३९ लाखांची बाकी थकबाकी आहे. शेतीसाठी वीज वापरणारे ३ लाख ६८ हजार १७३ ग्राहक असून तब्बल ३ हजार ५९९ कोटी २ लाख एवढी मोठी बाकी थकीत आहे. अन्य थकबाकी पथदिवे, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा आदींची आहे. सोलापूर जिल्ह्यातील या महाकाय थकबाकीमुळे ती वसूल करण्याचे महावितरणवर दडपण आहे. साहजिकच या वसुलीसाठी महावितरण आता आक्रमक पावले उचलणार आहे त्यामुळे अनेक ग्राहकांना महावितरणचा मोठा शॉक (Power supply cut off solapur district mahavitaran) बसणार आहे.  


वाचा : वीज ग्राहकांसाठी महावितरणची नवी योजना !    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !