BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ मार्च, २०२२

शेतीसाठी दहा तास वीज, उर्जाविभाग सकारात्मक !

 





मुंबई : शेतीसाठी दिवसा दहा तास वीज देण्याबाबत उर्जा विभाग सकारात्मक असून येत्या पंधरा दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

कृषिपंपासाठी दिवसा दहा तास वीज उपलब्ध करून  द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोठे आंदोलन केले. राज्यातील सर्वच शेतकरी दिवसा वीज मागत आहेत पण ती मिळत नाही आणि रात्री दिली जाणारी वीज देखील अपुरी असते त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री अंधारात पिकात जावे लागते आणि यावेळी सर्पदंश होण्याच्या मोठा धोका असतो. विविध प्राण्यापासून देखील शेतकऱ्याला धोका होऊ शकतो. आंदोलनाकडे लक्ष दिले जात नाही असा आरोप करीत  रात्री पिकांना पाणी देताना आढळलेले साप, अन्य प्राणी  सरकारी कार्यालयात सोडण्याचे आवाहन स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी केले होते. 

शेतकऱ्यांच्या मागणीला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश येताना दिसत असून येत्या पंधरा दिवसात तज्ञ समितीकडून याबाबत अहवाल घेऊन वीज नियामक आयोगाची मान्यता घेऊन तातडीने निर्णय घेतला जाईल असे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. दिवसा दहा तास वीज देण्याबाबत आज मंत्रालयात महत्वाची बैठक झाली असून या बैठकीस स्वभिमानीचे राजू शेट्टी देखील उपस्थित होते. या बैठकीतच उर्जा मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. 

आज झालेल्या बैठकीत सद्या सुरु असलेले वेळापत्रक आणि दिवसा वीज दिल्यानंतर विद्युत वहन क्षमता आणि आर्थिक भार याबाबतची माहिती देण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीलाच राजू शेट्टी यांनी दिवसा दहा तास वीज मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क असल्याचे सांगून उर्जामंत्री आणि अधिकारी यांची नकारात्मक भूमिकेबाबत संताप व्यक्त केला. विद्युत भाराची विभागणी करण्यात बळी घेण्यासाठी शासनाला केवळ शेतकरीच दिसतो काय ? असा परखड आणि संतप्त सवाल शेट्टी यांनी विचारला. शेतीसाठी दहा तास वीज कशा प्रकारे देता येईल याची सविस्तर माहितीच शेट्टी यांनी या बैठकीत सादर केली. शिवाय शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या चुकीच्या बिलाबाबत देखील राजू शेट्टी यांनी विषय उपस्थित केला. चुकीची दिलेली बिले दुरुस्त करून मिळण्यासाठी राज्यभर दुरुस्ती अभियान राबविण्यात यावे असे देखील त्यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज महावितरणला जोरदार फैलावर घेत काही मागण्या रेटल्या. राज्यात महापूर, कोरोना अशी आलेली संकटे तसेच दोन टप्प्यातील एफ आर पी यामुळे वीज बिलांच्या सवलतीची योजना एक वर्षाने वाढविण्याची देखील मागणी करण्यात आली. या योजनेची  मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सी आणि कंपनीचा चुकारपणा याचा शेतकरी बांधवाना मोठा फटका बसलेला असल्याचे सांगत महावितरण कडूनच मीटर रीडिंग घेण्यात यावे अशी मागणीही शेट्टी यांनी केली. अखेर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सकारात्मकता दाखवत पंधरा दिवसासाठी आंदोलन थांबविण्याची विनंती शेट्टी यांना केली. 

शेतीसाठी दिवसा दहा तास वीज देण्याबाबत उर्जा विभागाने सकारात्मकता दाखवली असून पंधरा दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होताना दिसत असून याबाबत निर्णय येण्यासाठी आता केवळ पंधरा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !