BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ मार्च, २०२२

वीज बिलांच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने सोडविणार !

 



मुंबई : शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाच्या दुरुस्तीचा प्रश्न त्वरित सोडविण्यात येईल आणि ही बिले तपासून दुरुस्तीच्या सूचना देण्यात येतील अशी ग्वाही आज उर्जामंत्री नितीन राउत यांनी दिली आहे. 


राज्यात विजेचे बिल न भरलेल्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडण्याची मोहीमच महावितरणने हाती घेतली आहे पण चुकीच्या बिलाच्या असंख्य तक्रारी शेतकरी करीत आहेत. जादाची बिले देण्यात आली असून काही ठिकाणी तर विजेचे कनेक्शन जोडले नसतानाही अशा ग्राहकांना बिले आली आहेत. शिवाय कमी हॉर्स पॉवरचे पंप असताना जादा हॉर्स पॉवर दाखवून बिले देण्यात आली आहेत आणि दुरुस्ती करून मागितली तर आधी बिले भर मग दुरुस्ती करू हे महावितरणचे नेहमीचे पालुपद सुरु आहे त्यामुळे शेतकरी आणि अन्य ग्राहकांचीही कोंडी होत आहे. यात तोडगा निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची बिले भरायची राहिली आहेत. अशा शेतकऱ्यांचा देखील वीज पुरवठा तोडण्यात येत आहे त्यामुळे असंतोष निर्माण झालेला आहे. 


चुकीची बिले तपासून तातडीने दुरुस्ती करण्याची कार्यवाही करण्यात येईल असा विश्वास उर्जा मंत्र्यांनी दिला आहे. कोळसा टंचाई असल्याने आणि हजारो कोटींची वीजबिले थकली असल्यामुळे राज्यात भारनियमन करावे लागले असे उर्जामंत्र्यांनी नुकतेच सांगितले होते. आधीच वीज खंडित करण्याची मोहीम राबवली जात असल्याने शेतकरी अडचणीत आलेला असताना पुन्हा लोडशेडींगचे स्पष्ट संकेत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले होते त्यामुळे राज्यातील शेतकरी अधिकच धास्तावून गेला होता. उन्हाळा सुरु झाला असताना संभाव्य भारनियमन शेतकरी वर्गाला  न परवडणारे आहे. राज्यात तूर्त कोणतेही लोडशेडींग नसल्याचे उर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले. 


शेतीसाठी दिवसा दहा तास वीज मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबाबत आंदोलन हाती घेतले आहे. शेतकऱ्यासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याबाबत बोलताना उर्जामंत्र्यांनी सौर कृषिपंप याजना राबविणार असल्याची माहिती दिली आहे. दिवसाची वीज देण्याबाबत नियोजन असून राज्यात तूर्तास तरी भारनियमन केले जाणार नसल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. समोर उन्हाळा असल्याने भारनियमन होण्याचा धसका घेतला गेला होता परंतु एवढ्यात तरी राज्यात लोडशेडींग होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने शेतकरी आणि अन्य ग्राहकांना देखील दिलासा मिळाला आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !