BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ मार्च, २०२२

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षांचा आज फैसला !

 




सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या बहुचर्चित ठरलेल्या निवडणुकीनंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक होत आहे त्यामुळे अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे जिल्हयातील दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची निवडणूक यावेळी चांगलीच चर्चेची आणि रंगतदार ठरली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह अन्य काही दिग्गज नेत्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने त्यांना या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही. उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यावर या नेत्यांनी अपीलदेखील केले होते परंतु अपिलात सुद्धा त्यांचे अर्ज अवैध असल्याचा निर्णय आला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देखील जिल्हयातील अनेक नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला होता. 

सदर निवडणुकीनंतर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड आज केली जाणार असून सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया सुरु होत आहे. जिल्हा दूध उत्पादक संघाच्या मुख्य कार्यालयात ही निवडणूक होत असून नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी संचालक मंडळाची सभा बोलाविण्यात आली आहे. सभेच्या विषयपत्रिकेवर २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन निवडी कारण्याबाबतचाच विषय विषयपत्रिकेवर आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून सुरु होणारी निवडीची ही प्रक्रिया दुपारी साडे बारा वाजेपर्यंत चालण्याची अपेक्षा आहे. 

राज्य सरकारने जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती केली होती त्याला आजच एक वर्षे पूर्ण होत असून आजच या नव्या निवडी होत आहेत. अडचणीत असलेल्या दूध संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान नव्या संचालक मंडळावर आणि आज निवड होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासंमोर असणार आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्ष पदासाठी जिल्हा परिषद सदस्य असणारे रणजितसिंह शिंदे आणि योगेश सोपल यांची नावे चर्चेत आहेत तर उपाध्यक्ष पदासाठी दिपक माळी यांच्या नावाची चर्चा आहे. माळी हे माजी आमदार राजन पाटील यांचे समर्थक आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांच्या निवडणुकीसाठी नेतेमंडळींनी रात्री उशिरापर्यंत बैठक झाली आहे. 

जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ हा जिल्ह्यातील राजकारणासाठी अत्यंत महत्वाचा असल्याने या निवडीकडे जिल्ह्यातील अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. रणजितसिंह शिंदे आणि योगेश सोपल या दोघांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत असून त्यांच्यापैकी नेमके कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडतेय याची जिल्ह्यात उत्सुकता असून दुपारी साडे बारा वाजेपर्यंत या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !