BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ मार्च, २०२२

पंढरपूर तालुक्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरण विधानसभेत !

 




पंढरपूर : तालुक्यातील मगरवाडी येथील शेतकरी सुरज जाधव यांच्या आत्महत्येचे प्रकरण विधानसभेत उपस्थित करण्यात आले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.


राज्यात महावितरणकडून बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. महावितरणची हजारो कोटींची थकबाकी ग्राहकाकडे अडकल्याने ही कंपनी आर्थिक संकटात आली आहे. यामुळे महावितरणने गेल्या काही महिन्यांपासून वसुलीची मोहीम राबविणे सुरु केले असून आता ही मोहीम गतिमान झाली आहे. उन्हाळा सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देणे आवश्यक असताना याच काळात शेतीचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे  त्यामुळे शेतकरी देखील या नव्या संकटात सापडला आहे. त्यातच मगरवाडी येथील तरुण शेतकरी सुरज जाधव याने कर्जबाजारी झाल्यामुळे तसेच अन्य कारणांनी आत्महत्या केली आहे. 


सुरज जाधव या शेतकऱ्याने शासनाच्या धोरणावर संताप व्यक्त करणारा एक व्हिडीओ तयार केला आणि त्यानंतर विष प्राशन केले. यात उपचार सुरु असताना दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. या घटनेने पंढरपूर तालुका हादरला आणि याचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटले.  सुरज जाधव याच्या आत्महत्येचे काहींनी राजकारण देखील सुरु केल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. शेतकरी आणि सामान्य माणूस यांनी मात्र या शेतकऱ्याच्या आत्महत्येबाबत हळहळ व्यक्त केली आहे.  या आत्महत्येची चर्चा राज्यभर होत असतानाच आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला आहे. 


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज हा मुद्दा उपस्थिती केला. सुरज जाधव यांच्या कुटुंबियांशी आपण चर्चा केली असल्याचे सांगत ते म्हणाले, 'ज्या वेळेस पिकला पाणी द्यायची वेळ आहे अशा काळार त्याच्या शेती पंपाचे कनेक्शन कापण्यात आले. अशा प्रकारे शेतकरी आत्महत्या करतोय, अनेक शेतकरी आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत. ज्या पद्धतीने वीज कनेक्शन कापले जात आहे त्यामुळे एक सुरज जाधव पाहायला मिळत आहे. पण सरकार अनेक सुरज जाधव तयार करीत आहे. या घटनेतून सरकारने धडा घ्यावा आणि शेती पंपाची वीज कापण्याचं सुरु केलेलं सत्र थांबविण्यात यावे व तसे आदेश देण्यात यावेत अशी मागणी फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे केली. 


सुरजची वेदना 

सुरज जाधव यांनी विष प्राशन करण्यापूर्वी तयार केलेला व्हिडीओ सामाज माध्यमावर वेगाने व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधून त्याने आपली वेदना मंडळी होती. त्याने म्हटले होते, " शेतकऱ्याच्या जन्माला आपण कधीच येणार नाही परत ... गेम इज द ओव्हर .. आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं, इथून पुढे नाही आयुष्य ! शेतकरी नामर्द आहे, आपण शेतकऱ्याच्या जन्माला परत कधीच येणार नाही. सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या नादी लागत नाही... शेतकऱ्याचा कधी विचार करणार नाही सरकार हे..."  


महावितरणने सुरु केलेल्या कारवाईच्या मोहिमेमुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. प्रचंड थकबाकीमुळे महावितरण आर्थिक अडचणीत आले असतानाच शेतकरी थकीत वीज बिले भरण्यास असमर्थता दाखवत आहेत. महावितरण कडून थकीत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडला जात आहे. यामुळे उभी पिके जाळून जाण्याचे संकट बळीराजावर आले आहे. महावितरण अधिकाऱ्यांच्या नावाने शिवारात शिमगा होत आहे तर या अधिकारी वर्गाला वसुलीचे प्रचंड दडपण आहे. अपेक्षित वसुली करण्याचा तगादा या अधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरून आहे. वापरलेल्या विजेचे पैसे वसूल करणे हे महावितरणसाठी आवश्यक बनले आहे परंतु शेतकऱ्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. 


दिवसा दहा तास शेतीसाठी वीज द्यावी या  मागणीसाठी शेतकरी आक्रोश करत आहेत तर दुसरीकडे महावितरण रात्री मिळत असलेल्या विजेचा कालावधी कमी करीत आहे. जागोजागी शेतकरी महावितरणच्या विरोधात रस्त्यावर उतरू लागले आहेत आणि हा संताप आता वाढतच चालला आहे. शेतकरी बांधवांची पिके जळू नयेत आणि त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे. कष्टाने पिकवलेली पिके जर विजेअभावी हाताची गेली तर हे नुकसान पुन्हा भरून येणार नाही आणि शेतकरी अधिकच संकटात सापडेल ही भीती अगदी ठळक दिसू लागली आहे. (Issue of farmer suicide is present in the assembly)

    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !