BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ मार्च, २०२२

'या' आमदारांनीच दिला फाशी घेण्याचा इशारा !



मुंबई : आमदार रवी राणा हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून आ. राणा यांनी आज फाशी घेण्याचा इशारा विधानसभेतच दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


महापालिका आयुक्त यांच्यावर शाई फेकण्याचे प्रकरण राज्यभर चर्चेचे ठरले आणि याच प्रकरणी अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर अमरावती येथे प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार राणा यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केल्याने राज्यभर चर्चेचा विषय बनला होता. याप्रकरणी आ. राणा यांना अटकपूर्व जामीनही मिळाला आहे. आज मात्र या विषयावर विरोधी पक्षाने विधानसभेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आ. राणा यांनी विधानसभेत सरकारच्या विरोधात अत्यंत संतापून बोलताना गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्यावर आरोप करीत 'मी येथेच फाशी घेईन' असे विधान केले.  


आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगत त्यांनी एकदम फाशी घेण्याचाच इशारा दिला त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय खळबळ उडवून देणारा ठरला आहे. घटनेदिवशी मी अमरावती येथे नसताना माझ्यावर रात्री साडे दहा वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा गुन्हा दाखल करण्यासाठी आमच्यावर दबाव असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे जर मला न्याय नाही मिळाला तर मी येथेच फाशी घेईन असे धक्कादायक आणि खळबळ उडवून देणारे विधान आमदार रवी राणा यांनी केले आहे.  


महापालिका आयुक्त यांच्यावर शिवभक्तांनी शाई फेक केली तेंव्हा आपण दिल्लीत एक बैठकीत होतो. माझ्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल झाला असल्याचे फोनवरून सांगण्यात आले. सरकारमधील काही लोकांच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त हे सांगत आहेत. जवळपास दीडशे पोलीस माझ्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी खासदारांचाही अपमान केलेला आहे. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी फोन करून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितला तसेच मला अटक करण्याचे आदेश देण्यात आले असे देखील आ. राणा म्हणाले. 


छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्यानंतर ५ दिवसांनी हा पुतळा हटविण्यात आला आणि तो गोडावूनमध्ये ठेवला गेला. पुतळा गोदामात ठेवल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या त्यामुळे आयुक्त यांच्यावर शाई फेकण्याचे प्रकरण घडले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.   आमदार रवी राणा यांनी एक फलक झळकावत आपल्यावर झालेल्या अन्यायावर दाद मागितली तसेच या विषयी विधीमंडळात एक समिती नेमण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर आणि पोलीस आयुक्त आरती सिंग यांना निलंबित करण्याची मागणी देखील आ. रवी राणा यांनी केली.  


अशा प्रकारचे फाशी घेण्याचे विधान बहुधा पहिल्यांदाच एखाद्या आमदारांने केले असावे.  आपल्याला आज तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांची आठवण येत असल्याचे सांगतानाच आ. राणा यांनी गृहमंत्र्यांना 'तुमचाही अनिल देशमुख होईल' अशा प्रकारचा गर्भित इशाराच देवून टाकला आहे . दुपारी दीड वाजता झालेल्या घटनेचा गुन्हा माझ्यावर रात्री साडे दहा वाजता दाखल होतो, आणि मला हे फोनवरून सांगण्यात येते. आमच्यावर एवढा दबाव आहे की रवी राणा दिसला तर गोळी मारून टाका असे देखील सांगण्यात आले. असे आ. राणा यांनी विधानसभेत बोलताना देखील सांगितले.   



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !